Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालक मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजपाच्याच बैठकीत तक्रारीचा सूर

पालक मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजपाच्याच बैठकीत तक्रारीचा सूर 


सागंली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगली दौर्‍यामध्ये आगामी निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्यासाठी झालेल्या जिल्हा सुकाणू समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यपध्दतीचा पंचनामाच अधिक ठळकपणे दिसून आला.

बावनकुळे यांचा पुर्वनियोजित दौरा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि एकसंघ भाजप असे चित्र रंगविण्याचे प्रयत्न झाले तरी सुकाणू समितीच्या बैठकीत तक्रारीचा पाढा वाचला गेला. खुद्द पालकमंत्री खाडे यांनी मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून प्रशासकीय पातळीवर हस्तक्षेप होत असल्याचे तक्रार केली तर सुकाणू समितीतील जेष्ठ सदस्यांनी रखडलेल्या जिल्हा व तालुका समिती नियुक्तीवरून आणि निधी वाटपावरून पालकमंत्री खाडे यांच्या विरूध्द तक्रारी केल्या.

बावनकुळे यांनी सातारा जिल्हा दौरा केल्यानंतर तासगाव, मिरज आणि इस्लामपूर याठिकाणी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका, रोडशो, जनसंवाद आदी माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच विकासाचाच नव्हे तर भाजपच्या विजयाचा चेहरा असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला. अगदी रस्त्यावरील भेळपुरी विक्रेत्यापासून सामान्य माणसाशी संवाद साधून पुन्हा मोदींचा नारा किती गरजेचा आहे हे सांगण्यात प्रयत्न केला. तत्पुर्वी तासगावमध्ये खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या तीन मतदार संघातील तीन मतदान केंद्राची जबाबदारी असलेल्या योध्दा (वॉरियर्स) कार्यकर्त्यांशी हितगूज केले. त्यांना लोकसभा निवडणुकीतील काम करण्याचे कानमंत्र दिला.

दुसर्‍या बाजूला मिरजेतील विश्रामधामवर सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार, आजी माजी आमदार, लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, आजी, माजी जिल्हा प्रमुख यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत दिवसभराच्या दौर्‍याच्या यशापयशाची चर्चा न होता, पालकमंत्री खाडे यांच्या कारभाराबाबत नाराजीच नव्हे तर तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडी, तालुका पातळीवरील शासकीय समित्यांची नियुक्ती रखडली आहे. मित्र पक्षांना सत्तेत किती सहभागी करून घ्यायचे आणि भाजप कार्यकर्त्यांना किती स्थान द्यायचे याचाच निर्णय होउ शकलेला नाही. तसेच निधी वाटपातील असमानतेबाबत तर तक्रारी होत्याच, पण याचबरोबर मंजूर कामांचा निधीही पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून अडविण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्ष विस्तार करीत असताना तालुका पातळीवरील पदाधिकार्‍यांनी जर एखाद्या कामाचा प्रस्ताव देउन मंजूर केला असला तरी त्याला आडकाठी आणण्याचे काम केले जात असून यामुळे पक्ष विस्ताराला गती रोधक बसत असल्याची तक्रार होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही

आमच्या तालुक्यासाठी वेळ दिला जात नाही, मात्र मिरज मतदार संघातील गल्लीबोळातील कामाच्या उद्घाटनासाठी वेळ दिला जातो. गणेशोात्सवाच्या काळात मिरज मतदार संघातील बहुसंख्य मंडळाच्या आरतीला उपस्थिती लावलीच, पण काही घरगुती गणेश दर्शनासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला. अशाने पक्षाचा विस्तार कसा होणार आणि लोकसभेतील विजयाचा रथ कसा हाकणार असा सवाल उपस्थित करण्यात आला.

तर याच वेळी पालकमंत्री खाडे यांनी महायुतीतील मित्र पक्षाकडून कामात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार करीत असताना ही तक्रार वरिष्ठ पातळीवर केली तर दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली. भाजपमध्ये होत असलेल्या तक्रारी आणि घटक पक्षाकडून होत असलेली कोंडी पालकमंत्री खाडे यांना भेदणे अशक्य असल्याचीच एकप्रकारे कबुली दिली गेली असेच म्हणावे लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.