Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गेल्या सात वर्षांपासून महिला इस्रायलमध्ये नोकरीसाठी; नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि..

गेल्या सात वर्षांपासून महिला इस्रायलमध्ये नोकरीसाठी; नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि..


पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही हल्ले करण्यात येत आहेत. यामुळे आता संघर्ष पेटला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले असून हजारो नागरिक जखमी झालेत. इस्रायलसोबतचं जगातील अन्य देशांच्या नागरिकांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. काही परदेशी नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

या परदेशी जखमी नागरिकांमध्ये एक भारतीय महिला सुद्धा आहे. ही महिला केरळमधील असून ती इस्रायलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. शिजा आनंद (वय ४१) असे या महिलेचे नाव आहे. शिजा ही भारतात राहणाऱ्या नवऱ्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. हल्ला झालेला असताना आपण सुरक्षित असल्याचे सांगण्यासाठी म्हणून तिने फोन केला होता. ती नवऱ्यासोबत बोलत असताना अचानक तिचा कॉल कट झाला आणि सोबतच तिच्यामागे मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे तिकडे काहीतरी अघटीत घडल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले.

शिजासोबत असणाऱ्या केरळमधील दुसऱ्या सहकाऱ्यांनी काही वेळाने आनंद कुटुंबियांना संपर्क करून शिजा बद्दल कळवले. हल्ल्यात ती जखमी झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती देण्यात आली. शिजाचा नवरा आणि दोन मुले भारतात राहतात. नवरा पुण्यामध्ये नोकरीला आहे. तर, शिजा ही गेल्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये नोकरीसाठी आहे.

केरळमधील २०० पेक्षा अधिक जण बेथलहेम येथील हॉटेलमध्ये अडकले असून सर्व सुरक्षित असल्याची माहिती आहे. कोचीमधील ४५ जण पॅलेस्टाइनच्या एका हॉटेलमध्ये अडकले असून या गटाला सीमा ओलांडण्याची परवानगी मिळाली आहे.

शनिवारी इस्रायलवर गाझा पट्टीतून हल्ला झाला. गाझा पट्टीवर हमासची सत्ता आहे. हमासने इस्रायलवर जवळपास ५ हजार रॉकेट्स डागले. इस्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. शिवाय अमेरिका इस्रायलच्या बाजूने प्रत्यक्षात रणांगणात उतरला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.