Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीर गाडगीळांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न ; पृथ्वीराज पाटील

आमदार सुधीर गाडगीळांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न ; पृथ्वीराज पाटील 


सागंली  : आ. सुधीर गाडगीळ हे विविध विकास कामांसाठी 2 हजार 600 कोटींचा निधी आणल्याचे सांगत आहेत. यातील 1 हजार 800 कोटीचा निधी आपणासह खासदार, पालकमंत्र्यांनी आणला आहे.

याचे फुकटचे श्रेय घेण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. आ. गाडगीळ यांना आता राजकारणाचा रंग लागला आहे. ते सांगलीच्या प्रश्नावर मौनी आमदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी केला. पाटील हे पुष्पराज चौकात असलेल्या त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
.
ते म्हणाले, आ. गाडगीळ यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात 2 हजार 650 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे ते सांगत आहेत. प्रत्यक्षात यातील अठराशे कोटी रुपये महाविकास आघाडीचे सरकार असताना आ. जयंत पाटील, आपण, खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून आला आहे. असे असताना ते इतरांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत. सोन्याच्या व्यवसायात सचोटीचा, विश्वासार्हतेचा व्यवसाय करणार्‍या आ. गाडगीळ यांना आता खोटे सांगण्याची वेळ का आली, हे बघितले पाहिजे.

सांगलीमध्ये पाचशे खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी आणि वसतिगृहासाठी 233 कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने जून 2022 मध्ये आपल्या प्रयत्नामुळे मंजूर केले आहेत. याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे. याचे श्रेय द्यायचेच असेल तर खासदारांना दिले पाहिजे. रेल्वे मार्गाचे सध्या दुहेरीकरण आणि इलेक्ट्रीफिकेशन सुरू आहे. त्यामुळे जुने पूल पाडून नवे पूल बांधण्यात येत आहेत. या पुलाचेही ते श्रेय घेत आहेत. जुने बुधगाव रोेडवरील पूलही 2015-16 मध्ये रेल्वे प्रशासनाने मंजूर केला आहे.

इनामधामणी ते स्फूर्ती चौक रस्त्याला सार्वजनिक मंत्री असताना अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रयत्नामुळे मंजुरी दिली आहे. याचे पत्रही माझ्याकडे आहे. खोतवाडी पुलाचेही माझ्याहस्ते भूमिपूजन झाले आहे. सांगली-पेठ रस्ताही जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे. असे असताना इतरांनी केलेल्या कामाचे ते श्रेय लाटत आहेत. गेल्या नऊ वर्षात त्यांनी कधीही सांगलीच्या शेरीनाल्याचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा, रोजगाराचा, गुंठेवारीचा प्रश्न विधिमंडळात मांडला नाही. महापालिकेतील वीज घोटाळा, कवलापूरचा विमानतळाचा प्रश्नही त्यांनी कधी उपस्थित केला नाही. सांगलीच्या प्रश्नावर इतर आमदारांनी प्रश्न मांडले आहेत. ते एक मौनी आमदार आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.

…तर सांगलीचे शांघाय झाले असते

आ. गाडगीळ यांनी सांगलीसाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 हजार 600 कोटी रुपये आणले असते, तर सांगलीचा शांघाय झाला असता, असा टोला पाटील यांनी लगावला. जुने मंजूर झालेले निधीचे आकडे सांगून मतदारांची ते दिशाभूल करीत आहेत. त्यांनी सादर केलेले विकास निधीचे आकडे हे राजकीय लाभासाठी आहेत, असेही ते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.