घरातच बार सुरू करण्याची उत्तराखंड सरकारची परवानगी
पुष्कर सिंह धामी सरकारने उत्तराखंडवासीयांना होम मिनी बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे लोक त्यांच्या घरातच बार उघडू शकतील आणि घरात 50 लिटरपर्यंत दारू साठवू शकतील. उत्तराखंड सरकारने, उत्पादन शुल्क धोरण 2023-24 राज्यात लागू केले आहे. या धोरणांतर्गत मद्यप्रेमींना वैयक्तिक वापरासाठी घरातच दारूचा बार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या धोरणांतर्गत डेहराडूनमधील एका अर्जदाराला मिनी बार परवानाही देण्यात आला आहे. डेहराडून येथील एका व्यक्तीने मिनी बारसाठी परवाना मागितला होता. हा परवाना प्रशासकीय स्तरावर 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच गेल्या बुधवारी देण्यात आला. डेहराडूनचे जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी राजीव सिंह चौहान यांनी सांगितले की, उत्पादन शुल्क धोरणानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वैयक्तिक वापरासाठीचा हा परवाना जारी करण्यात आला आहे. अशा प्रकाराचा हा पहिला परवाना असल्याचे ते म्हणाले.
या अटी शर्तींचे पालन केल्यास मिळणार परवाना
उत्तराखंड सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणामध्ये, मिनी बार सुरू करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. डेहराडूनचे जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी राजीव चौहान यांनी सांगितले की जी व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून आयकर भरत आहे अशी कोणतीही व्यक्ती या परवान्यासाठी अर्ज करू शकते. या परवान्यासाठी 12 हजार रुपये शुल्क असून हा परवाना वार्षिक स्वरुपाचा असणार आहे. जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकदा मान्यता मिळाल्यावर परवानाधारकाला 9 लिटर भारतीय बनावटीची विदेशी दारू, 18 लिटर विदेशी दारू, 9 लिटर वाईन आणि 15.6 लिटर बिअर घरी ठेवण्याचा अधिकार मिळेल.
निर्णयाबद्दल नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न
या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला अटींचे पालन करण्यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. यांनी सांगितले की , बारचा वापर वैयक्तिक वापरासाठीच करण्यास परवानगी मिळेल. याचाच अर्थ असा की याचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग करता येणार नाही. 'ड्राय डे' ला हा बार बंद ठेवावा लागेल. जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणाले की, परवानाधारकाने यापुढे 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा कोणीही बार स्थापन केलेल्या परिसरात येणार नाही याची काळजी घ्यावी. होम बारद्वारे तपासणी केल्यानंतरच परवान्याचे नूतनीकरण केले जाईल. या धोरणावरून काहींनी टीका केली आहे. या बारचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग होत नाही हे कोण तपासणार? या बारमध्ये येणारी व्यक्ती 21 वर्षांहून अधिक वयाची आहे हे कोण पाहणार? हा बार ड्राय डे ला बंद आहे की नाही हे कोण पाहणार ? आणि घरातच बार सुरू करायचा असल्यास त्यासाठी परवानगी कशाला हवी, अनेकांनी तसा आधीच सुरू करून ते वापरत देखील आहेत अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.