धक्कादायक.. प्रसूतीवेळी डॉक्टरच्या हातातून निसटून नवजात बालकाचा मृत्यू; नाशिकमधील प्रकार
नाशिकमधून समाजमन हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांच्या हातून नवजात बाळ जमिनीवर आपटल्याने बाळाचा मृत्यू झाला. नाशिकच्या मेडिकल कॉलेज आणि महाविद्यालयात हा प्रकार घडला.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावलं आहेत. या घटनेमुळे सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर सरकारी रुग्णालयांतील अनागोंदी प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. महिलेच्या प्रसूतीदरम्यान बाळ पूश करताना बाळ उडून जमिनीवर पडले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप संबंधित कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या नवजात बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बालकाच्या मृत्यूचे कारण समोर येईल. या प्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कुटुंबीयांकडून तक्रार दखल करण्यात आली आहे.याबाबत मृत बाळाच्या आईने म्हटले की, माझी नॉर्मल डिलिव्हरी असल्याने भूल दिली नव्हती. डॉक्टरांनी पूश करायला सांगितल्यानंतर बाळ बाहेर निघाले, पण समोरच्या डॉक्टरला ते पकडता न आल्याने खाली पडले. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून बाळाचा जन्म होताच ते दगावले होते. त्यात आमची चूक नाही असं म्हटलं आहे. आडगाव पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करत व्हिसेरा राखून ठेवला असून चौकशी सुरू केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.