पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने कृष्णेतील तीन टन कचरा उचलला; ' माझी माय कृष्णामाई' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली, दि. ३० : पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने 'माझी माय कृष्णामाई' या उपक्रमांतर्गत विष्णूघाट ते बंधाऱ्यापर्यंत स्वच्छता करून तब्बल तीन टन कचरा गोळा केला. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी राबवलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाबाबत बोलताना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम म्हणाले, कृष्णा नदीला गेले चार-पाच दिवस झाले पाणी नसल्यामुळे नदी कोरडी पडली आहे. सगळीकडे कचराच कचरा साठलेला होता आणि त्याची दुर्गंधी पसरलेली होती. तशातच कोयना धरणातून सोडलेले पाणीही आज सायंकाळपर्यंत सांगलीजवळ पोहोचणार होते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आज नदी स्वच्छ करायचीच हा निर्धार आम्ही पृथ्वीराज पाटीलसाहेब यांच्याकडे बोलून दाखवला. त्यांनीही प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
पुरामुळे आलेले ओंडके, कचरा, निर्माल्य, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या न विरघळलेल्या मूर्ती, प्लास्टिक, जुन्या चादरी असा अनेक प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. तीन टनापेक्षा जास्त हा कचरा निघाला. त्यासाठी महापालिकेचेही सहकार्य लाभले. त्यांनी जेसीबी आणि घंटागाड्या दिल्या.
या उपक्रमासाठी बिपीन कदम, भारती भगत, रवी खराडे, विसावा मंडळाचे संजय चव्हाण, सनी धोतरे, आयुब निशानदार, नेमिनाथ बिरनाळे, प्रदीप पाटील, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, संतोष भोसले, मंदार काटकर, राजेंद्र कांबळे, दिक्षीत भगत, शीतल सदलगे, शिरीष चव्हाण, नामदेव चव्हाण, राजगौंडा पाटील, सलमान मेस्त्री यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते व नागरिक यांचे खूप मोठे योगदान लाभले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.