Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार

गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार


उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ताजे प्रकरण अदानी ग्रुपशी संबंधित ऑडिट फर्मचे आहे. यावर सरकारी यंत्रणेने आपली पकड घट्ट केली आहे. ही फर्म गौतम अदानी यांच्या 5 कंपन्यांचे ऑडिट करते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी म्हणजेच NFRA ने एसआर बाटलीबोई  विरोधात तपास सुरू केला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एनएफआरएने ऑडिट कंपनीकडून अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या ऑडिटशी संबंधित फाइल्सची मागणी केली आहे. एजन्सीने ऑडिट कंपनीला 2014 पासून आतापर्यंतच्या सर्व ऑडिट फाइल्स देण्यास सांगितले आहे. एजन्सीचा तपास कधी संपणार आणि या तपासाच्या कक्षेत कोण येणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

कंपनीने अदानीच्या 5 कंपन्यांचे ऑडिट केले

ऑडिट कंपनी एसआर बाटलीबोई अदानी समूहाच्या 5 लिस्टेड कंपन्यांचे ऑडिट करते. विशेष म्हणजे या पाच कंपन्यांकडून समूहाचा 50 टक्क्यांहून अधिक महसूल आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चने एक रिपोर्ट सादर केली होती. या रिपोर्टमध्ये ग्रुपवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रिपोर्टमध्ये याला जगातील सर्वात मोठी अकाउंटिंग फसवणूक असेही म्हटले. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि सर्वोच्च न्यायालयाने सेबीला हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले.

या कंपन्यांचे ऑडिट करते

ऑडिट फर्म SR बाटलीबोई अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, एसीसी आणि अंबुजा सिमेंट्सच्या कामाचे ऑडिट करते. यापूर्वी या फर्मने अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे 10 वर्षांचे ऑडिटही केले होते. कायद्यानुसार, परदेशी लेखा संस्थांना देशात लेखापरीक्षक म्हणून नोंदणीकृत करता येत नाही. यामुळेच परदेशी कंपन्या भारतात स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करतात. ऑडिट फर्म SR बाटलीबोई ही EY ची मेंबर फर्म आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.