Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यात शिक्षकाला बेदम मारहाण

साताऱ्यात शिक्षकाला बेदम मारहाण


सातारा: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक विजय गुरव यांना विद्यार्थ्यांच्या पालकासह दोघांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विजय गुरव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एका वर्गामधील एका विद्यार्थ्याचे वर्तन वर्गाशी सुसंगत नव्हते. वर्गात असताना तो सातत्याने हातवारे करत असे. त्याला संबंधित शिक्षकाने समज दिली होती. याची मुख्याध्यापकांकडे तक्रारही करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुरव यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना हा प्रकार कानावर घालून त्यांना शाळेत चर्चेसाठी बोलावले होते.या गोष्टीचा राग मनात धरून विद्यार्थ्याच्या पालकाने “त्या शिक्षकाला सांगा अन्यथा त्यांना चापटू,’ अशी धमकी दिली होती.


मंगळवारी अचानक संबंधित विद्यार्थ्यांचे वडील आणि त्याचा मित्र शाळेत आले. त्यांनी या शिक्षकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर त्या दोघांनी गुरव यांना जोरदार मारहाण केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. काही शिक्षकांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारहाण करणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या प्रकारामुळे शाळेतील वातावरण काही काळ तंग झाले होते. शाळेच्या शिक्षकांनी गुरव यांना तात्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी या प्रकाराचा निषेध केला असून याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल माहिती घेणार असून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरव गेली अनेक वर्षे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांचे वर्तन चांगले असताना अचानक हा प्रकार घडल्याने त्यांचे संबंधित सहकारी आणि परिचितांना या घटनेमुळे धक्का बसला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.