सिंधुदुर्गमधील तपासणी नाक्यावर ७२ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
सिंधुदुर्ग : गोवा राज्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सोमवारी पहाटे ही कारवाई केली. यामध्ये एकाला अटक करून ७२ लाखांची दारू, एक ट्रक, मोबाईल असा तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिली.
जगदीश देवाराम बिश्नोई (रा. जालोर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील पाटण येथे दूध वाहतुकीच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील पेठनाका येथे पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचे एक हजार बॉक्स पकडून दोघांना अटक केली होती. त्यामुळे गोवा राज्याच्या सीमेवरील राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्यावरील अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निमार्ण झाले होते. याबाबत सत्यमेव जयते संघटनेचे प्रभात हेटकाळे, समीर पठाण यांनी याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची त्यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते.
ना. देसाई यांच्या आदेशानंतर इन्सुली येथील तपासणी नाक्यावरील तपासणी कडक करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे पथक नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी गोव्याहून मुंबईकडे निघालेला ट्रक (एनएल ०१ एजी ९२५२) अडवला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. याबाबत ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला अटक करून ट्रकसह दारू जप्त करण्यात आली.कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सिंधुदुर्गचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजित शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.