Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील प्रकार; घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब मारण्याचा प्रयत्न

सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील प्रकार; घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब मारण्याचा प्रयत्न

वांगी: बिहार मध्ये जाणवते तशी क्रूरता सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात पाहायला मिळाली असून पूर्व वैमनस्यातून घराला करंट देऊन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत शंकरराव निकम यांच्या कुटुंबियाना मारण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुरज निकम यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री बारा ते दीड च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सामाजिक कार्यकर्ते सुरज निकम, त्यांचे आई-वडील आणि भाऊ राहत असलेले वांगी गावातील शेतातील घराला करंट देण्याचा प्रयत्न केला. निकम यांच्या घराजवळ असणाऱ्या हेवी टेन्शनच्या ट्रांसफार्मर मधून तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या कोयंड्याना अडकवण्यात आल्या. नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची अशा हेतूने हल्लेखोरांनी त्याची जोडणी केली होती. रात्री दीडच्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मरजवळ स्फोट होऊन जाळ लागला. मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे जागे झालेल्या निकम कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. या स्फोटामुळे ट्रीप होऊन वीज गेल्याने सुदैवाने घराबाहेर पडूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. काही वेळाने वीज पूर्ववत आल्यानंतर निकम यांच्या मातोश्रींना हलकासा करंट जाणवला. त्यानंतर पुन्हा तारा ट्रिप झाल्या. सावध झालेल्या निकम कुटुंबीयांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा प्रयत्न हे जाणून तातडीने बचावाच्या हालचाली केल्या. या दरम्यान काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र हे हल्लेखोर कोण होते त्याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही.

मध्यरात्रीनंतर सुरज निकम यांनी संबंधित अनेकांना याबाबत कळवले. त्यानंतर काही नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने चिंचणी वांगी पोलिसांना याची दखल घेण्यास सांगितले. याप्रकरणी सुरज निकम यांनी काही व्यक्तींच्या बाबतीत संशय व्यक्त केला असून त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. 'तरुण भारत संवाद'ने संपर्क साधल्यानंतर सुरज निकम म्हणाले, ज्यांच्या बाबत शंका आहे, त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत मात्र ती जाहीर करणार नाही. हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि त्यामध्येच या संशयितांच्या बाबतीत चौकशी व्हावी आणि त्यातून सत्य बाहेर यावे अशी आपली अपेक्षा आहे. दुपारी अधिकृतरित्या याबाबत आपण गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.