Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा परिषद भरतीत वेळापत्रकाअभावी उमेदवारांचा जीव टांगणीला, नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित

सांगली जिल्हा परिषद भरतीत वेळापत्रकाअभावी उमेदवारांचा जीव टांगणीला, नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित


सागंली : जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या भरतीला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांत संभ्रमावस्था आहे. नियोजित परीक्षा स्थगित केली आहे. परीक्षा कधी सुरू होणार, याची कल्पना परीक्षा घेत असलेल्या कंपनीने प्रशासनाला दिली नाही. कंपनीच्या या भूमिकेमुळे परीक्षा कधी होणार, या विचाराने परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे.


जिल्हा परिषद वर्ग तीनमधील रिक्त ७५४ पदांच्या भरतीसाठी जिल्ह्यात ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. प्रारंभी ही परीक्षा ऑक्टोबरपासून होणार होती; परंतु तयारी नसल्याचे कारण देत ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ७ ते ११ अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील १६ ते २२ ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. यातील १७ ऑक्टोबरपर्यंत ६ संवर्गाकरिता परीक्षा घेतली; परंतु आता जवळपास अर्ध्या संवर्गाची परीक्षा झाली नसताना अचानक परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

उर्वरित संवर्गासाठीची परीक्षा पुढे ढकलण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे प्रशासनाने सांगितले. तिसऱ्या टप्प्यात विविध संवर्गाच्या रिक्त पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नाही. तूर्तास या पदाची परीक्षा पुढे ढकलल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे; मात्र नेमकी ज्या संवर्गाची परीक्षा अद्याप झाली नाही. ती केव्हा होईल याबाबतचे काहीही ठावठिकाणा नाही. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या या भूमिकेमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे जिल्हा परिषद आणि शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.

अजून ५० टक्के भरती बाकी

आतापर्यंत १४ संवर्गातील परीक्षा झाली असून १६ संवर्गाची म्हणजे ५० टक्के भरती बाकी आहे. यात मुख्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक अशा मोठ्या पदांचे संवर्ग बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती होण्यास अजून किती दिवस लागणार, याची धास्ती अर्ज केलेल्या उमेदवारांना लागली आहे.

तिसऱ्या टप्प्यात ज्या पदासाठी परीक्षा होणार आहे. त्याचे अद्याप वेळापत्रक मिळाले नाही. संबंधित कंपनीकडून पुढील वेळापत्रक जाहीर होताच उर्वरित संवर्गातील पदांच्या परीक्षा होतील. - प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.