सांगली जिल्ह्यात झिका व्हायरसची एन्ट्री
सांगली जिल्ह्यात झिका व्हायरसची एन्ट्री झाली आहे. मिरज येथील शास्त्री चौकातील सात वर्षांच्या मुलीचा रक्तजल नमुना झिका पॉझिटिव्ह आला आहे. ताप, सर्दी, खोकला या लक्षणामुळे या मुलीला 9 सप्टेंबर रोजी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखवले होते. उपचार करून घरी पाठवले होते. दोन दिवसांत ती बरी झाली. मात्र या मुलीची चिकनगुनिया व डेंग्यू चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे तिचा रक्तजल नमुना झिका तपासणीसाठी एन.आय.व्ही. पुण्याकडे पाठवला होता. 29 सप्टेंबर रोजी तपासणी अहवाल मिरज सिव्हील हॉस्पिटलला प्राप्त झाला. त्यामध्ये अहवाल झिका पॉझिटिव्ह आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील झिकाचा हा पहिला रुग्ण आहे. झिकाचा संसर्ग झालेली ही मुलगी सध्या बरी आहे. या मुलीच्या घर परिसरातील तीन व्यक्तींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परिसरात रुग्ण सर्वेक्षण, डास प्रतिबंधक औषध फवारणी केली जात आहे.
झिका विषाणू कसा पसरतो?
झिका विषाणू एडीस डासांच्या प्रजातीमुळे पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांना चावल्यास विषाणू पसरतो.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरसमुळे ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत तर, इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे ही लक्षणे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.