Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अत्यंत उथळ, सुमार अन् भरकटलेला चित्रपट

अत्यंत उथळ, सुमार अन् भरकटलेला चित्रपट

काही चित्रपट चांगले असतात, तर काही वाईट असतात. पण काही चित्रपट असे असतात जे पाहिल्यावर हा खरंच चित्रपट आहे का? असा प्रश्न पडतो. आज (२७ ऑक्टोबर रोजी) प्रदर्शित झालेला ‘गडकरी’ हा चित्रपट या तिसऱ्या प्रकारात मोडणारा आहे.

केवळ सेन्सॉरने प्रमाणपत्र दिलंय म्हणून याला चित्रपट म्हणायची तसदी घ्यावी लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर चरित्रपट बनवणं आणि तो इतका सुमार दर्जाचा असणं याहून दुर्दैवाची गोष्ट मराठी सिनेसृष्टीसाठी असूच शकत नाही. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर इतका उथळ, निरर्थक चित्रपट काढण्याचं आणि तो लोकांसमोर सादर करायचं धाडस केल्याबद्दल याचे निर्माते, वितरक, दिग्दर्शक यांचे कौतुक केले पाहिजे.



नागपूरसारख्या शहरापासून दिल्लीपर्यंतचा नितीन गडकरी यांचा प्रवास हा महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. लहान कार्यकर्ता, विद्यार्थी परिषदेचे नेते, भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष ते केंद्रिय मंत्री हा संपूर्ण प्रवास आणि या प्रवासात आपलं साधं आयुष्य यामुळेच नितीन गडकरी हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. नेमकी हीच गोष्ट या चित्रपटात अत्यंत अरसिकतेने आणि अत्यंत सुमार शैलीत सादर केली आहे. त्यामुळे हा नितीन गडकरी यांचा अपमान आहे असं किमान मला तरी हा चित्रपट पाहताना वाटलं. एकीकडे आपण मराठी चित्रपट हा सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं देऊ पाहतोय असं आपण म्हणतो खरं पण वास्तवात मात्र ‘गडकरी’सारखे चित्रपट देऊन आपण आपलीच किंमत कमी करतोय असं प्रकर्षाने जाणवतंय.

आता हा चित्रपट नेमका कोणत्या उद्देशाने बनवला गेला अन् तो प्रदर्शित करण्याची इतकी घिसाट घाई का करण्यात आली यामागील कारणं निर्मात्यांनाच माहीत. परंतु चित्रपट पाहणारा कोणताही सामान्य प्रेक्षक पडद्यावर चालणाऱ्या या प्रकाराला चित्रपट म्हणणार नाही हे मात्र नक्की. खरं बघायला गेलं तर नितीन गडकरी यांचं बालपण, तरुणपण, राजकारणात त्यांचा झालेला प्रवेश त्यामागील पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींवर अत्यंत अभ्यासपूर्वक काम करून ही कथा आणखी रंजक पद्धतीने दाखवता आली असती, पण याचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांच्या मनालाही हा विचार स्पर्शून गेला नसल्याने हा एक अत्यंत सुमार माहितीपट बनला आहे. एखादा माहितीपटही बऱ्यापैकी अभ्यासपूर्ण असतो, पण ‘गडकरी’ पाहताना तुम्हाला त्यातून माहितीही मिळणार नाही.

नितीन गडकरी यांच्याविषयी जी माहिती पब्लिक पोडियममध्ये सहज उपलब्ध आहे फक्त त्या माहितीचा आधार घेऊन आणि चित्रपटाआधी तीन भाषांमध्ये डीसक्लेमर वाचून दाखवून सरसकट जे मनात येईल ते या माहितीपटातून दाखवण्यात आलं आहे. कसलाही आधार नसलेली कथा, विस्कळीत अन् हात-पाय व धड नसलेली पटकथा, कृत्रिम आणि भावनाशून्य संवाद, पात्रांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतील उदासीनता, अतिशय वाईट अन् बालिश अभिनय आणि सूर हरवलेलं संगीत हा सगळा पोरखेळ सादर करून नितीन गडकरी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अवमानच या चित्रपटातून केला गेला आहे.

जर लेखक उत्तम नसेल किंवा दिग्दर्शकाकडे उत्तम व्हीजन नसेल तर निदान तांत्रिक बाजू तरी उत्तम ठेवाव्यात, जेणेकरून प्रेक्षक कथेत गुंतला नसला तरी सादरीकरण पाहून समाधान मानतो. इथे तर त्या बाबतीतही बोंब आहे. अत्यंत सुमार दर्जाचे कॅमेरे वापरुन आणि त्याची कशीही हाताळणी करून फ्रेम्स लावलेल्या आहेत, काही ठिकाणी तर चित्रपट मोबाईल कॅमेरावर शूट केल्यासारखं वाटतं. हा फरक ओळखण्यासाठी कोणत्याही ट्रेड एक्स्पर्ट, समीक्षक किंवा तज्ज्ञाची गरज नाही, अगदी सामान्य प्रेक्षकांच्याही ही गोष्ट चटकन नजरेत येऊ शकते. बायोपिक म्हंटलं की किमान वेशभूषा आणि मेकअप हे चोख असायला हवे, ही किमान अपेक्षा प्रेक्षकांची असते. परंतु या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणारा अभिनेता काही काही फ्रेम्समध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दिसत असेल तर नेमका दोष कोणाला द्यायचा? हा प्रश्न पडतो.

हे समीक्षण लिहायला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ जरी लेखक आणि दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी यांनी या चित्रपटाच्या कथेसाठी काढला असता तर कदाचित चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं. नितीन गडकरी यांच्या भूमिकेत राहुल चोपडा व त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ऐश्वर्या डोरले हे दोन चेहेरेच थोडेफार सुसह्य आहे बाकी त्यांच्या अभिनयाबाबतीत न बोललेलंच बरं. बाकी इतर पात्रं तर अक्षरशः हास्यास्पद आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गापलीकडेही नितीन गडकरी यांचं खूप मोठं कार्य आहे, आणि ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायची नक्कीच आवश्यकता नाही. इंटरनेटवर बऱ्याच माध्यमातून त्याबद्दल माहिती उपलब्ध आहे. नितीन गडकरी यांनी दिलेल्या कित्येक सडेतोड मुलाखती उपलब्ध आहेत, त्यातून गडकरी यांचं योगदान आपल्या लक्षात येईल. शेवटी इतकंच की गडकरींच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट म्हणजे एका शाळकरी विद्यार्थ्याने हौस म्हणून कॅमेरा भाड्यावर घेऊन आपल्या समवयस्क मित्रांबरोबर केलेली एक माहितीपर शॉर्टफिल्म आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.