नांद्रे गावाला सुजलाम् सुफलाम् करणार ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख, माजी सरपंच राजगोंडा पाटील (घुमट) यांनी दिली माहिती
नांद्रे गावाला सुजलाम सुफलाम करणार ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख, माजी सरपंच राजगोंडा पाटील (घुमट) यांनी दिली माहिती
सांगली : नांद्रे गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी टाकी कालबाह्य झाली आहे. तिची क्षमता वाढवून सात लाख लिटर करणार आहोत. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन टाक्यांमधून बारा लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचा मानस आहे.
त्यामुळे आमची सत्ता आल्यास संपूर्ण नांद्रे गावाला मुबलक पाणीपुरवठा होईल. शिवाय गावातील मुलांच्या भवितव्यासाठी जि.प.च्या शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार आहेत.
शिवाय अंगणवाड्यांचीही दुरूस्ती करून नूतनीकरण करणार .आणि नांद्रे गाव सुजलाम सुफलाम करणारच असल्याची माहिती ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख, माजी सरपंच राजगोंड पाटील (घुमट) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नांद्रे येथे सध्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घुमट-पाटील यांनी त्यांच्या पॅनेलसह त्यांच्या विकासाचे व्हिजन पत्रकारांसमोर मांडले. नांद्रे येथे वाड्या-वस्त्यांची संख्या वाढली आहे. तेथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सध्या असलेल्या गटारी उघड्या आहेत.
आमचे पॅनेल सत्तेवर आल्यास या सर्व वाड्या-वस्त्यांवरील गटारी बंधिस्त करण्यात येतील. शिवाय तेथील रस्तेही दुरूस्त करून त्यांचे डांबरीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचा आमच्या पॅनेलचा मानस आहे.
नांद्रे गावातील महत्वाचा प्रश्न हा सांडपाण्याचा आहे. गावातील सर्व सांडपाणी एकत्र करून ते एका पाईपलाईनद्वारे सध्या नदीत सोडले जाते. मात्र ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणाऱ्या खुल्या जागेत सांडपाणी शुद्धीकरणाचा प्लांट उभारण्याचा आमच्या पॅनेलचा मनोदय आहे. या सांडपाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर ते नदीत न सोडता ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही घुमट-पाटील यांनी सांगितले.
सध्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या यंत्रणेचे वीजबिल साधारण एक ते दीड लाख रूपये येत आहे. याची बचत करण्यासाठी या सर्व यंत्रणा सोलार सिस्टीमवर सुरू करण्याचा आमच्या पॅनेलने निर्धार केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे दीड लाख रूपये बचत होणार आहेत. त्यातून गावातील आवश्यक विकासकामे करण्यात येणार असल्याचेही घुमट-पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सध्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याच्याशी संलग्न ५० बेडचे हॉस्पिटल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याची मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नांद्रेतील ग्रामस्थांना गावातच चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील स्वच्छेतालाही प्राधान्य देण्यात येणार असून घंटागाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.स्वच्छ हवेसह नागरिकांचे आरोग्य वर्धन करण्यासाठी गावात ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहेत. शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क उभारण्याचाही ग्रामविकास पॅनेलचा मनोदय आहे. विविध प्रकारच्या प्रदुषणापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी गावात वृक्षारोपणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याचेही घुमट-पाटील यांनी सांगितले. गावात पूर्वी केलेल्या विकास कामांसह नांद्रे गावचा कायापालट करण्याचा वचननामा ग्रामविकास पॅनेलने दिल्याने ग्रामविकास पॅनेलची नांद्रे ग्रामपंचायतीमध्ये नक्की सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.