Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरोदरपणात महिलांचा सगळा खर्च, लाखोंचं आमिष; नर्सिंग होममध्ये सुरू होता भयंकर प्रकार, असा झाला पर्दाफाश

गरोदरपणात महिलांचा सगळा खर्च, लाखोंचं आमिष; नर्सिंग होममध्ये सुरू होता भयंकर प्रकार, असा झाला पर्दाफाश


मुंबई : कायदेशीर नर्सिंग होमच्या माध्यमातून नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीला मुबंई पोलिसांनी गजांआड केलं आहे. यामध्ये एका बोगस डॉक्टरचाही समावेश आहे. बाळ होत नसलेल्या जोडप्यांना ही टोळी नवजात बालके विकायची. त्यासाठी जोडप्याकडून ५ लाख रुपये घेतले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. या नर्सिंग होमला बंद करण्यात आलं आहे. तेथून पाच दिवसांच्या आणि ४५ दिवसांच्या बाळाची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी भागात चालत असलेल्या बेकायदेशीर नर्सिंग होमच्या माध्यमातून सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. यात पोलिसांनी दोन नवजात बालकांची सुटका केलीय. विशेष म्हणजे या प्रकरणात मास्टरमाईंड असलेली ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगरमध्ये बेकायदेशीर नर्सिंग होम चालवलं जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक शरद नाणेकर यांच्या नेतृत्वाखाली या रॅकेटचा भंडाफोड केला. बनावट गिऱ्हाइक पाठवून या नर्सिंग होममधून नवजात बालक खरेदी करण्याचा प्लान पोलिसांनी आखला. ५ लाखांना व्यवहार ठरवला. त्यानंतर बाळाची विक्री करत असताना पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले.

चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली. मुख्य सूत्रधार ज्युलिया फर्नांडीस ही नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असे .यामध्ये तिच्यासोबत एजंट, परिचारिका आणि परवाना नसलेले डॉक्टरही असायचे. वरळी येथे राहणाऱ्या ज्युलियावर याआधी वडाळा टीटी, ठाणे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. नवजात बालकांच्या विक्री प्रकरणात तिच्यावर हा सातवा गुन्हा दाखल झालाय. या आधी केलेल्या गुन्ह्यांमध्ये ती जामिनावर सुटली होती. यापूर्वी ज्युलीयाला जुलै २०२२ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अशाच प्रकरणांमध्ये अटक केली होती.

ज्युलिया फर्नांडिस हीने आयव्हीएफ केंद्रांमध्ये देखील काम केले आहे. या केंद्रांद्वारे ती मुलांची गरज असलेल्या दाम्पत्यांशी संपर्क साधायची. त्यानंतर ती आपल्या एजंटांच्या मदतीने ती नवजात बाळाला विकू इच्छिणाऱ्या पालकांसोबत बोलणी करत असे आणि बाळांची विक्री करायची. बाळाची गरज असलेल्या लोकांचा आणि ते विकणार असलेल्या पालकांचा शोध घेण्यासाठी तिने एजंट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या या तीन एजंट महिला आहेत. त्याशिवाय, नवजात बाळाला खरेदी करणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली. तसेच एक बोगस डॉक्टरचाही यात समावेश आहे.

या रॅकेटमध्ये महिलांची प्रसुती बेकायदेशीर नर्सिंग होममध्ये केली जात होती. बाळ विकू इच्छिणाऱ्या महिलेला एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवलं जात होतं. वैद्यकीय आणि इतर लागणारा खर्चही हे आरोपीच करायचे, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन नवजात बालकांना स्वयंसेवी संस्थेकडे सोपवले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.