महिलेच्या पोटात अडीच किलोची गाठ; सांगली सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
सांगली: येथील शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल अडीच किलो वजनाची गाठ काढण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास देवकारे व सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करत महिलेची संकटातून सुटका केली. ४४ वर्षे वयाच्या या विवाहितेला काही महिन्यांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता.
गर्भवतीसारखे पोटही फुगल्यासारखे दिसत होते. तपासणीअंती अंडाशयात गाठ असल्याचे निष्पन्न झाले. गाठीतील पेशींचे नमुने तपासले असता ती कर्करोगाची असल्याचेही स्पष्ट झाले. औषधोपचार सुरू असतानाच सोमवारी तिला तीव्र वेदना होऊ लागल्या. नातेवाइकांनी मिरज रस्त्यावरील खासगी रुग्णालयात नेले; पण तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेस असमर्थता दर्शविली. त्यामुळे रात्री सांगलीत शासकीय रुग्णालयात आणले.
तपासणीअंती तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवकारे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास मिसाळ यांनी भूल दिली. निवासी डॉक्टरांनी मदत केली. दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गाठ बाहेर काढण्यात आली. तत्पूर्वी गाठीतील द्रव काढून तिचा आकार कमी करण्यात आला. या गाठीचे वजन तब्बल अडीच किलो भरले. वेळीच शस्त्रक्रिया करुन गाठ बाहेर काढल्याने महिलेच्या जिवावरचे संकट टळले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.