आमदार सुमनताई पाटील उपोषण सोडणार? शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आमदार सुमनताई पाटील यांची भूमिका समजून घ्यावी असे सूचित केल्याचे युवा नेते राेहित पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील या साेमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राेहित पाटील व शेकडाे कार्यकर्ते देखील आहेत.
राेहित पाटील म्हणाले आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत सरकार आमच्या मागणीबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करीत आहाेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हांला फोन केला होता. आंदोलनाबाबत माझ्या आईच्या प्रकृतीची चौकशी दाेघांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आंदोलनाच्या मागणी तात्काळ पूर्ण करावी अशी विनंती देखील केल्याचे पाटील यांनी नमूद केले.पाटील पुढे म्हणाले माझी तब्येत दोन दिवसांपूर्वी बिघडली होती. पण आम्ही उपोषणाची तारीख जाहीर केली होती. त्यामुळे तब्येत बरी नसताना सुद्धा उपोषण करावे लागले आणि आम्ही केले आणि या उपोषणाला यश येईल अशी आशा आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.