Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रिय प्रकाशभाई, महाराष्ट्राच्या आघाडीची कॉफी आणखी गोड करा...- मधुकर भावे

प्रिय प्रकाशभाई, महाराष्ट्राच्या आघाडीची कॉफी आणखी गोड करा...- मधुकर भावे

प्रिय प्रकाशभाई, 
सप्रेम नमस्कार... 
गेले दोन दिवस तुमच्याबद्दलचा विचार मनात घोळत आहे. दोन दिवसांपूर्वी तुम्ही पवारसाहेबांकडे गेलात... त्यांनी दिलेल्या कॉफीत साखर टाकून कॉफी गोड करून घेतल्याची तुमची बातमी खूप ‘गोड’ वाटली. अगदी त्याच कपातील कॉफी पितोय, असेच वाटले.  मंगळवार, दिनांक २४ अॅाक्टोबर रोजी तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांच्या संबंधात एक जबरदस्त निवेदन केलेत.. भाजपाविरोधातही केलेत... पंतप्रधानांच्या विरोधातही केलेत... हे सगळे वाचल्यानंतर दोन दिवस मनात येत होते की, तुमच्याशी बोलावं... खरंतर तुम्हाला भेटायला यावं, अशीच इच्छा होती. बरेच दिवसांत भेट नाही. ७-८ महन्यांपूर्वी पुण्याला तुमच्या घरी भेट झाली... थोडे निवांत बोलणेही झाले. एका मुलाखतीकरिता आलो होतो. तुमची तब्बेत सुधारलेली पाहून आनंद वाटला. तुम्ही आता ठणठणीत बरे झाले आहात. उद्याच्या महाराष्ट्राचे आणि देशाचे चित्र तुम्ही आता अधिक ठळकपणे पाहू शकता.  तुम्ही ज्या पिढीचे वारसदार आहात... त्या तीन पिढ्या देशाला आणि महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे सांगायला नको. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी  माझी  थेट भेट झाली नसली तरी त्यांना १९५५ साली वनमाळी हॉल सभागृहात जाताना ओझरते पहायला मिळाले. तेव्हा मी  मुंबईला मामाकडे आलो होतो. विद्यार्थीदशेत होतो.  तुमचे पिताश्री आदरणीय भय्यासाहेब हे तर अत्रेसाहेबांच्या बरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील एक महत्त्वाचे भागिदार होते. त्यानंतर अत्रेसाहेबांकडे अनेकवेळा ते यायचे, तेव्हा भेट व्हायचीच. तुम्ही राजकारणात आल्यानंतर अधून-मधून भेटी झाल्या.  १९८६ साली तुम्ही एक महान इतिहास घडवलात. ‘रिडर्स राम आिण कृष्ण’ या संबंधात रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना तुम्ही एकत्र केलेत. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इितहासातील, ‘पूर्वी झाला नाही... पुढे होणार नाही...’ असा सर्वार्थाने महाप्रचंड मोर्चा तुमच्याच नेतृत्त्वाखाली निघाला. त्यादिवशीच्या ‘दैनिक सामना’मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आठ कॉलम शिर्षक केले होते.... 

‘रिडर्स, राम आणि कृष्ण प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू’ या शिर्षकानंतर तुम्ही आयोजित केलेला मोर्चा धडकी भरवणारा होता.  त्याचवेळी भिती वाटणाराही होता.  तुम्हाला आठवत असेल... मी तुम्हाला भेटायला आलो. आपण चर्चा केली... आजच्या ‘सामना’तील शिर्षकाने मोर्चाला वेगळे वळण लागले तर त्यात गरीब माणसांचेच मरण होईल.  तुम्ही मला शांतपणे म्हणालात... ‘काळजी करू नका... तुम्ही मोर्चाला या... पहा...’ मी मोर्चाला येणारच होतो... ‘लोकमत’चा मुंबई प्रतिनिधी म्हणून काम करतच होतो.  शिवाय ‘मराठा’ची पुरोगामी परंपरा माझ्याबरोबर तेव्हाही होती, आजही आहे. आहे.  लोकमतमध्ये मी ३४ वर्षे होतो.  या ‘लोकमत’नेही याच पुरोगामी परंपरा जपल्या आहेत. जिथे पुरोगामी विचार बाजुला ठेवला गेला, त्या वृत्तपत्रापासून  मी लगेच दूर झालो आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण चुकीच्या भूमिकांचे समर्थन संपादक म्हणूनही कोणी करू नये, या मताचा मी आहे. ‘दैनिक प्रहार’मधून दूर होताना माझी तीच भूमिका होती. 

मी सभेला आलो... तुम्हाला चिठ्ठी पाठवली... तुम्हाला भेटण्याचा उद्देश सांगितलाच होता... तुमच्या भाषणातील एखाद्या चुकीच्या वाक्याने ‘सामाना’तील शिर्षकामुळे प्रचंड सभा कोणत्याही टोकाला पोहचू शकली असती.... 
तुम्ही भाषणाला उभे राहिलात... पहिलेच वाक्य उच्चारलेत... ‘आजच्या ‘सामना’मध्ये बाळासाहेबांनी ‘रिडर्स राम आणि कृष्ण’ प्रश्नावर महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका जाहीर केलेली आहे...’ तुमचं वाक्य ऐकून क्षणभर वाटले, आता पुढचं वाक्य काय बोलता... शांतपणे तुम्ही म्हणालात... ‘बाळासाहेब, महाराष्ट्रात आज काही पेटवण्याची गरज असेल तर गरिबांच्या घरातील चूल पेटवण्याची गरज आहे...’ पत्रकार कक्षात बसलेलो असतानाही मी तुमचे भाषण झाल्यावर सरळ व्यासपीठावर आलो. काळाघोडा येेथे सभा झाली होती... 

तुमचं भाषण संपलं आणि तुमच्या पाठमोरा येवून तुमच्या पाठीवर थोपटले... दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकमत’ध्ये ‘एका वाक्याने काय परिणाम होऊ शकतो’ याचे वर्णन केले. काही शब्द साहित्यात लिहिले गेलेले नाहीत. पण, न लिहलेल्या शब्दांनी केलेले परिणाम इितहासाने अनुभवलेले आहेत. त्यादिवशीच्या तुमच्या त्या वाक्याने माझ्या मनावर तोच परिणाम झाला. आणि तुमची प्रतिमा उंचच उंच वाटली. त्या सभेला आता जवळपास ४० वर्षे होतील बाळासाहेब... या चाळीस वर्षांत किती पाणी वाहून गेले... गरिबांच्या चुली पेटवण्याचे काम अजून धडपणे झालेले नाही. अगदी उज्ज्वला गॅस सिलेंडर आल्यानंतरही... गेली दहा वर्षे ‘रसोई’ची जाहीरात केल्यानतंरही त्या सिलिडंरच्या जाहिरातीत पंतप्रधानांचे फोटो छापल्यानतंरही... आणि त्या सिलिंडरच्या किमतींचा स्फोट झाल्यानतंर सामान्य माणसाला जगणे जीवन सुसह्यच नव्हे तर, अशक्य होऊन बसलेले आहे. हे तुम्हाला सांगण्याची गजर नाही... तुम्ही बुद्धीमान आहेत... तुमचे वाचन अफाट आहे, याची मला जाणीव आहे.... तुम्ही भय्यासाहेबांचे पुत्र आणि घटनाकार बाबासाहेबांचे नातू आहात. बाबासाहेबांच्या घटनेची वीण उस्कटण्याचे काम गेले काही वर्षे सुरू झालेले आहे. अशावेळी तुमची महाराष्ट्राला आणि देशाला पुरोगामी विचाराच्या भूमिकेला बळ देण्यासाठी फार मोठी गरज आहे... व्यक्तिगत मते, राजकीय मते काही विशिष्ट वेळेला बाजूला ठेवायची असतात.. स्वातंत्र्याच्या लढ्यात ‘देश स्वतंत्र करणे’ एवढे एकच ध्येय समोर होते.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या एकाच घोषणेसाठी सगळ्या पक्षांनी आपले झेंडे गुंडाळले होते. बाळासाहेब... आज अशी वेळ आली आहे की, राजकीय पक्षांच्या अस्तित्वापेक्षा या देशातील लोकशाहीचे अस्ितत्त्व, संविधान... सर्वधर्म समभाव... हेच आजचे देशापुढचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. अशावेळी तुम्ही ज्या वंचित आघाडीचे नेते आहात.... त्या वंचित आघाडीला सोबत घेवून तुम्ही याच आघाडीचा झेंडा खांद्यावर घ्यायचा आहे.  आणि भाजपाविरोधात लढणाऱ्या आघाडीमध्ये तुमचा सहभाग असल्याशिवाय या लढाईत उणेपणा येणार आहे... तुम्ही वेगळे नेते आहात... वेगळ्या परंपरेतील आहात... 

घटना तुमच्या खानदानातूनच देशाला अर्पण झालेली आहे. अशावेळी महागाई-बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या... देशातील अनेक सार्वजिनक संस्था विकून टाकणे... खोटी आश्वासने... जाहिरातबाजी... फोडाफोडी... पाडापाडी, या सगळ्या विषयांपेक्षासुद्धा, देश वाचवणे, संविधान वाचवणे, लोकशाही वाचवणे, गावपातळीपासूनच्या अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका वेळेवर आणि नि:पक्षपाती होणे या सर्व प्रक्रियेला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकशाहीतून मिळालेले बहुमत हुकूमशाहीकडे चालले आहे. शासकीय यंत्रणा पक्षीय स्वार्थासाठी वापरल्या जात आहेत. हे सगळे लोकांना आता उघड-उघड दिसत आहे. अशावेळी तुमची वंचित आघाडी किमान महाराष्ट्रात तरी पुरोगामी विचारांच्या नेत्यांसोबतच राहिली पाहिजे. त्यात तुमचा पुढाकार असला पाहिजे.  तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहात. संदर्भाकरिता दोन मुद्दे मुद्दाम सांगतो....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेसंबंधी घटना तयार झाल्यानंतर केलेल्या भाषणात दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते...  ‘भारतात नव्याने आलेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत ठेवू शकेल... परंतु व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकवण्यास वाव देण्याची भीती मला वाटते. ही िनरसपटणाची जागा मला धोक्याची वाटते. स्वातंत्र्य आणि समतेचा बळी देवून कोणतेही राष्ट्र सामर्थ्यवान होऊ शकणार नाही. परंतु एखाद्याने राजकारणात महात्म्य पूजा दाखवली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाही प्रस्थापित करेल, हा धोकाही मला जाणवतो आहे.’ (डॉ. आंबेडकरसाहेबांची भाषणे : खंड-१, पृष्ठ १७५, १७६ आणि १७७) थोडीशी मागची आठवण मनाला अस्वस्थ करणारी आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे किमान ६ लोकसभा जागांवर भाजपा विरोधातील पुरोगामी उमेदवार पराभूत झाले. त्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आढळराव पाटील, राजू शेट्टी यांचा समावेश होता. हे झाले लोकसभेचे. परंतु विधानसभा २०१९ च्या अॉक्टोबरमधील निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते खाल्ल्यामुळे ३८ विधानसभा मतदारसंघात भाजपाविरोधातील निवडून येणाऱ्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. वंचित आघाडीने पाठींबा दिलेला एकमेव उमेदवार विजयी झाला, औरंगाबादह मतदारसंघातून. प्रकाशभाई, खुद्द तुम्हालाही सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.  आणि पराभूत झालेले उमेदवार ज्यांनी दलित असताना सर्वसाधारण मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेत निवडून येवून देशाचे गृहमंत्रीपद भूषविले होते ते आपल्या सर्वांचे आणि महाराष्ट्राचे प्रिय मित्र सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले. धरून चालूया की, तुम्ही विजयी झाला असतात आणि शिंदेसाहेब पराभूत झाले असते, तरी एकवेळ समजून घेतले असते... पण, शिंदे साहेबही पराभूत झाले... तुम्ही स्वत: पराभूत झालात आणि सोलापूरमधून कोणी सिद्धेश्वर स्वामी निवडून आले.  शिंदेसाहेबांना ३ लाख ६६ हजार ३७७ मते मिळाली. तुम्हाला १ लाख ७० हजार ७ मते मिळाली आणि ते जे कोणी स्वामी आहेत त्यांना ५ लाख २४ हजार ९८५ एवढी मते मिळाली. शिंदेसाहेब आणि तुम्ही या दाेन्ही मतांची बेरीज  ५ लाख ३६ हजार ३८४ होते. केवळ मते विभागली म्हणूनच शिंदेसाहेब पडले. बरं, निवडून आले ते स्वामी म्हणजे काही स्वामी विवेकानंद नाहीत... खोट्या जात प्रमाणपत्राची त्यांची केस चालूच आहे. प्रकाशभाई, राग मानू नका... पण, तुम्ही मोठ्या प्रमाणात मते घेतल्यामुळे सुशीलकुमार पडले आणि सोलापूर १० वर्षे मागे गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंघवार 

तपशील पाहूया....

अहमदनगर: सुधाकर आव्हाड ३० हजार मते... अमरावती: गुणवंत देवकरे ६० हजारहून अिधक मते... बीडमध्ये विष्णू जाधव ९० हजारहून अधिक मते... भंडारामध्ये के. एन. नान्हे ३५ हजारहून अधिक मते... बुलडानामध्ये भगवान शिरसकर १ लाख ५० हजारहून अधिक मते... चंद्रपूरमध्ये अॅड. राजेंद्र महाडोळे ७० हजारहून अधिक मते... धुळेमध्ये नबी अहमद ३५ हजारांहून अधिक मते... दिंडोरी बापू बोंद्रे ५५ हजारहून अधिक मते... गडचिरोली : रमेश गजबे १ लाखांहून अधिक मते. हातकणंगले : सय्यद १ लाख दहाजार अधिक मते... हिंगोली:  मोहन राठोड १ लाख ४० हजारहून अधिक मते... जळगाव... अंजली बाविस्कर ३५ हजारांहून अधिक मते... जालना : शरद वानखेडे ७५ हजारांहून अधिक मते... कल्याण : संजय हेडाऊ : ५५ हजारांहून अधिक मते... 

कोल्हापूर : डॉ. माळी ६० हजारांहून अधिक मते... लातूर : राम गारकर, १ लाखांहून अधिक मते... माढा : विजय मोरे, ५० हजारांहून अधिक मते... मावळ : राजाराम पाटील, ७५ हजारांहून अिधक मते... दक्षिण मुंबई : अनिलकुमार, ३० हजारांहून अधिक, उत्तर मुंबई : अब्दुल अंजारिया : ३० हजारांहून अिधक मते... इशान्य मुंबई : निहारिका खोंदले ६५ हजारांहून अधिक मते... दक्षिण-मध्य मुंबई : संजय भोसले ६० हजारांहून अधिक मते... नांदेड : यशपाल भिंगे , १ लाख ६० हजारांहून अधिक. नाशिक: पवनकुमार ९० हजारांहुन अधिक मते... उस्मानाबाद : अर्जुन सलगर ९५ हजारांहून अधिक मते... परभणी : महम्मद खान १ लाख ४० हजारांहून अधिक मते...  पुणे: अनिल जाधव ५० हजारांहून अिधक.. रावेर : नितीन कंदिलकर ६० हजार मतांहून अधिक.. सातारा: सहदेव येवले ४० हजारांहून अधिक, शिर्डी : संजय सुखदान ६२ हजारांहून अधिक, शिरूर : राहुल ओव्हाळ ३५ हजारांहून अधिक मते, ठाणे : मल्लकार्जुन पुजारी : ४० हजारांहून अिधक, यवतमाळ : प्रवीण पवार ८० हजारांहून अधिक मते. 

हा तपशील मुद्दाम दिला. 

सामान्य वाचकाला या आकडेवारीत काही स्वारस्य नाही. पण, वंचित आघाडीचा तुमचा प्रयोग यशस्वी झाला नाही... हे स्पष्ट होण्याकरिता हा तपशील मुद्दाम दिला. २४ सप्टेंबर १९४४ रोजी मद्रास येथे भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की, ‘आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे आहे.’ जर तुमची वंचित आघाडी सरकार स्थापन करू शकली असती, तरीही तुमचे मी अभिनंदन केले असते. पण, प्रत्यक्षात काय झाले? तुमच्यामुळे उलट भाजपाला फायदा झाला आणि त्यामुळे असे वातावरण निर्माण झाले की, भाजपाला फायदा होण्याकरिताच वंचित आघाडी तर उभी केली नव्हती? आणि म्हणून शंकेची पाल मनात चुकचूकते. दोन सिंहानी आपसात लढून घायाळ व्हावे, हेच तर भाजपाला हवे आहे. त्यांच्याजवळ महाराष्ट्रात लढायला नेता नाही. मोदी-शहा यांचे फोटो लावून त्यांची पोस्टर्स आहेत... दादा गटाला आता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरावा लागत आहे. शरद पवारसाहेबांनी त्यांचा फोटो लावायला दादागटाला विरोध केला... मग यशवंतराव यांचा फोटो उसना घेतला... दादा गटाचे जे मंत्री झालेत त्यापैकी कोणाचातरी फोटो लावून मते मिळत नाहीत... यशवंतराव स्वर्गातून विरोध करू शकत नाहीत... पण, यशवंतरावांना मानणारा जिवंत महाराष्ट्र तो पाहतो आहे... यशवंतरावांच्या फोटोचा गैरवापरही पाहतो आहे... त्याचाही हिशोब चुकता होईल.  तुम्हाला विनंती याकरिता की, दोन सिंहांच्या लढाईचा फायदा अन्य कोणाला मिळू नये. 

हा सरळ साधा हिशेब आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नातवाला  हात जोडून विनंती आहे की, जेव्हा बाबासाहेबांची घटना खिळखिळी होते आहे... निवडणूक आयोगाच्या प्रमुख नेमण्याच्या समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला बाजूला काढले जात आहे, तिथे एका मंत्र्याची नेमणूक होते... तसे विधेयक तयार आहे.. नारी वंदन घोषणा करताना मणिपूरध्ये दोन भगिनींची विवस्त्र धींड काढली जात आहे... हे सगळे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहू नका. आजच्या घडीला भाजपाविरोधातील सगळ्या शक्तींनी प्राणपणाने एकवटने हा एकच विचार घेवून तुम्ही आघाडीच्या मध्ये उभे राहिलात तर सगळ्यात जास्त आनंद स्वर्गीय बाबासाहेबांना होईल. तुम्ही कॉफीत साखर टाकून कॉफी गोड करून घेतलीत... आता वंचित आघाडीची एक गोणभर साखर भाजपाविरोधी आघाडीत तुम्ही घाला. मग, या देशाची लोकशाही, सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता हे सगळेच विषय गोड होतील. तुम्ही आता उद्धव ठाकरेसाहेबांच्या बरोबर राहणार आहात... विरोधी आघाडीबरोबरही रहा... तुम्हाला एक मनापासून सांगतो, मी ६५ वर्षे पत्रकारितेत आहे... माझे राजकीय अंदाज आजपर्यंत चुकलेले नाहीत... हे नम्रपणे सांगतो... यात अहंकार नाही... पण, यावेळी काय वाट्टेल ते झाले तरी महाराष्ट्रात शिंदे, फडणवीस, दादा या त्रिकुटाला महराष्ट्र भीक घालणार नाही... त्यांनी कितीही प्रयत्न केले... अगदी मोदी-शहा गल्लीबोळांत महराष्ट्रात  फिरले तरीही या महाराष्ट्रात या तिघांचे सरकार पुन्हा येणे शक्य नाही. 

अशावेळी बाबासाहेबांचे आणि घटनेच्या खानदानाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हवे आहेत. मी छोटा पत्रकार आहे. हे प्रातिनिधीक निमंत्रण आहे, असे समजा... महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि उद्याच्या पिढीसाठी तुम्ही आता नेतृत्त्व करायला पुढे या... रुसवे, फुगवे, राजकारण सगळं बाजूला ठेवा... मतभेत बाजूला ठेवा... ही वेळ मतभेद करण्याची नाही.  आपसात लढणारे १०० कौरव आणि ५ पांडव शत्रू चालून आला तेव्हा... ‘वयम पंचाधिकम... शतम...’ आम्ही ५ नव्हे १०५ आहोत... असे म्हणालेच... आज महाराष्ट्राने तेच म्हणण्याची गरज आहे.

 सध्या एवढेच...9892033458


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.