Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘मेरे खून का ‘कतरा... कतरा’ देश की अखंडता रखनेमे काम आएगा’- मधुकर भावे

‘मेरे खून का ‘कतरा... कतरा’ देश की अखंडता रखनेमे काम आएगा’- मधुकर भावे

काळ किती क्रूर आहे. बघता-बघता काळाच्या कराळ दाढेत ३९ वर्षे फस्त झाली. काहीजणांना दिवस जाता जात नाहीत. रात्र सरता सरत नाही... पण, काळाचे चक्र थांबत नाही. ते गतिमान आहे. बघता-बघता ३९ वर्षे झाली. आता हा लेख लिहित असताना ३९ वर्षांपूर्वी श्रीमती इंदिरा गांधी... देशाच्या महान पंतप्रधान... भुवनेश्वर येथे दौऱ्यावर निघाल्या होत्या. निघताना सोनियाजींना त्या सांगून गेल्या... ‘काही महत्वाच्या गोष्टींबद्दल उद्या बोलू...’ ओरिसाची राजधानी भुवनेश्वर येथे जाहीर सभेत त्यांचे पहिले २५-३० मिनीटांचे भाषण हे गेल्या ४०-४५ वर्षांतील देशाच्या बांधणीबद्दलचे होते. या महान देशाचे जागतिक महत्त्व किती आहे... इथली लोकशाही किती बलवान आहे, आणि ती सामान्य जनतेमुळे आहे.. हे सगळं त्या सांगत होत्या. पण त्यांच्या मनात कुठेतरी कोणाचीतरी भितीची सावली पडल्यासारखे जाणवत असावे. त्यांनी भाषणाचा सांधा बदलला. आणि एकदम त्या गंभीर झाल्या. शांत आवाजात त्या म्हणाल्या.. 

‘मैं आज जिवित हूँ... शायद कल नही रहूँंगी... उससे कोई फर्क नहीं पडेगा...  लेकिन मेरे खून का कतरा... कतरा... देश की अखंडता रखनेमें काम आयेगा....’  सारी सभा एकदम भावनाविवश झाली.  भाषण संपवून त्या राजभवनावर आल्या. त्यांच्या डोक्यात काय विचार असतील... त्यावेळचे ओरिसाचे राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे यांना रहावले नाही. त्यांनी भाषणातील त्या उल्लेखाबद्दल हळवेपणा व्यक्त केला.  त्यांना समजत नव्हते... ‘मॅडम असे का म्हणाल्या..’ ते ही अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी इंदिराजींचे भाषण देशभरातील सगळ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. 

३१ अॅाक्टोबर १९८४ रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सगळा देश ठप्प झाला.  इंदिराजी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तयार झाल्या. आणि बंदल्यातील फाटकाच्या बाहेर पडत असताना त्यांचा सुरक्षारक्षक बियंत सिंग याने दरवाजा न उघडता त्यांच्या छातीवर बंदूक रोखली. इंदिराजी जोरात ओरडल्या..... ‘तुम क्या कर रहें हो...’ वाक्य संपण्याच्या आतच धाड् धाड् गोळ्या चालवल्या गेल्या... मागे उभ्या असलेल्या सतवंतसिंग  या सुरक्षा रक्षकाने अख्खी स्टेनगन खाली केली. काय घडतेय ते कळायच्या आत क्रूर नियतिने एक भयानक हत्या घडवून आणली होती.  आजच्यासारखी प्रसार साधने नसताना सगळा देश सुन्न झाला.... आज एखाद्या चित्रपटासारखे हे सगळे दृश्य असे डोळ्यांसमोरून जात आहे. बातमी समजल्यानंतर तातडीने वसंतरावदादा पाटील यांच्या मदतीने मी, गृहखात्याचे राज्यमंत्री विलासराव देशमुख, वनमंत्री नानाभाऊ ऐंबडवार दिल्लीच्या विमानात बसलो आणि १ सफदरजंगला गेलो. प्रचंड गर्दीत आम्हाला तिथे कोण आत सोडणार होते? पण, गुलामनबी आझाद दिसले... त्यांना आवाज दिला... त्यांनी ताबडतोब आम्हा तिघांनाही आत घेतले. इंदिराजींचे पार्थिव समोरच होते... काही क्षण असे वाटले की, इतक्या गोळ्यांचा वर्षाव होवून त्यांचा चेहरा इतका ताजा आिण टवटवित आहे की, क्षणभर खरेही वाटणार नाही की, त्यांच्या देहाची चाळण झाली आहे... त्यांच्या अंत्यविधीपर्यंत दिल्लीत होतो. राजीव गांधी यांनी पार्थिवाला अग्नी देताना उजव्या हातात चंदनाचे पेटते लाकूड उचलले... डाव्या हाताने राहुल यांना पोटाशी धरले... तेव्हा राहुल यांचे वय अवघे १४ वर्षांचे होते.  पण, त्या लहान वयात त्याला काय कल्पना असणार की, नियतीने त्याच्यासाठी पुढे काय खेळ मांडला आहे... आणि अवघ्या ७ वर्षांनी, राजीव गांधी यांच्या अस्ताव्यस्त झालेल्या पार्थिव देहाला याच राहुलने चंदनाच्या चितेला भडाग्नी दिला. एकाच घराण्यातील दोन पंतप्रधान देशाच्या एकतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेला असा इतिहास कोणत्याही देशात घडलेला नाही.

आज इंदिराजींची आठवण याचकरिता होते आहे की, त्यांनी जपलेले आदर्श किती मोठे होते. त्यांना सांगण्यात आले होते की.... ‘तुमचे सुरक्षारक्षक बदला... हवेतर लष्करातील अधिकारी आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून ठेवतो. ’ इंदिराजींनी उत्तर दिले होते, ‘मी भारतीय लोकशाहीची पंतप्रधान आहे...’ आज हे सगळे आठवते आहे... इंदिराजी गेल्या... राजीवजी गेले...  सोनियाजी थकलेल्या दिसत आहेत. किती सोसलेय त्यांनी... त्यांना ‘परदेशी’म्हणून हिणवण्यात आले. पण, कोणत्याही भारतीय स्त्रीपेक्षा भारतीयत्त्वामध्ये, संस्कारामध्ये काकणभरही त्या कमी नाहीत. डोक्यावरचा पदर ढळलेला नाही. त्यांनीच २००४ साली ७० हजार किलोमीटरला प्रवास करून पुन्हा सरकार आणून दाखवले. 

आता खरगेसाहेबांच्या   खांद्यावर काँग्रेस देशात उभी आहे. खरगेसाहेबांनी स्वत:ला सिद्ध केलेले आहे. १ वर्ष पूर्ण झाले. ज्यांना असे वाटत होते की, काँग्रेसचा निवडून आलेला अध्यक्ष गांधी घराण्याच्या किंवा सोनियाजींच्या शब्दाप्रमाणे त्यांच्या मागे चालेल... पण, खरगेसाहेबांनी वर्षभरातच हे दाखवून दिले... आणि त्यांचे सत्त्व सिद्ध केले. आज काँग्रेसला एक सक्षम अध्यक्ष मिळालेला आहे. दलित समाजातील आहे... पक्ष आणि संघटनेचा गाढा अनुभव आहे. कर्नाटक राज्य भाजपाच्या हातून खेचून घेण्यात खरगेसाहेबांची सगळी रणनिती होती.  सगळ्या देशभरातील भाजपाविरोधाचे वातावरण एका कर्नाटकाच्या निकालानंतर जमीन-आस्मानच्या फरकाएवढे बदलले आहे.  पण, इंदिराजींच्या ३९ व्या स्मृतिदिनी काँग्रेसने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर नेत्यांनी कोणता निर्धार करायचा आहे?  काँग्रेसला पराभूत होऊन आता जवळपास १० वर्षे होतील... १९७७ साली पहिल्यांदा केंद्र सरकारमधील काँग्रेसची सत्ता... हातातून निसटली. काही चुकाही अशा झाल्या की, लोकांचा निर्णय स्वीकारावाच लागला. इंिदराजींनी त्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली. पण, पराभवानंतर इंदिराजींना आयुष्यातून उठवण्याचा डाव ज्यांनी रचला होता... तीच मंडळी अवघ्या दोन वर्षांत लोकांनी सत्तेवरून फेकून दिली. आज २०१४ च्या पराभवाला दहा वर्षे होत आली... पुन्हा एकदा इंदिराजींच्या मार्गाने काँग्रेसला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना जावे लागणार आहे. त्यासाठी थोडे मागे वळून पाहिले पाहिजे.

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा बंगला सोडताना दिल्लीत रहायला घर नसलेल्या इंिदरा गांधी... रहायचे कुठे? या प्रश्नाने जराही खचून गेल्या नाहीत. ज्या नेहरू घराण्याने  आपले अलाहाबादचे ‘आनंदभवन’ हे प्रचंड निवासस्थान देशाला अर्पण केले होते. ज्या परिवाराने आणि त्या परिवारातील प्रत्येक सदस्याने, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास स्वीकारला होता...  अगदी मोतीलाल नेहरू यांच्यापासून एकही सदस्य असा नव्हता... जो स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेला नाही... मोतीलालजींच्या पत्नी, पंडितजींच्या पत्नी, कन्या इंिदरा, बहिण कृष्णा, दुसरी बहिण विजया, या दोघींचे पती आणि खुद्द पंडीत नेहरू हे तर साडे नऊ वर्षे तुरुंगात होते. संपूर्ण परिवाराने स्वातंत्र्यासाठी १७ वर्षे  सहा महिने तुरुंगवास भोगला. दोन पंतप्रधानांचे बलिदान देशाच्या ऐक्यासाठी झाले. त्यांना दिल्लीत रहायला घर नव्हते.  पण,  ४८ तासांत बंगला सोडण्याची तयारी केली. त्या परिवाराचे स्नेही श्री महंम्मद युनूस यांच्या मालकिचा १२, विलिंग्डन क्रेसंट मार्ग, हा बंगला त्यांनी मोकळा करून दिला.


इंदिराजींनी पुढची लढाई त्याच बंगल्यातून लढवली. ज्या बिहारमधील बेलची येथे दलितांची क्रूर हत्या झाली होती, सत्ता गमावली असताना, स्वत: पराभूत झाल्या असताना, अवघ्या एक महिन्याच्या आत भर पावसात इंदिराजी बेलचीला पोहोचल्या.  तो इितहास आज अंगावर काटा आणतो. ज्या अहलाबाद मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या होत्या... त्याच पराभूत मतदारसंघात अवघ्या चार महिन्यांनंतर इंदिराजी जेव्हा पोहोचल्या तेव्हा अथांग जनसागराने त्यांचे स्वागत केले. त्याचदिवशी त्यांना जाणवले की, लोक आपल्या सोबत आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा त्यांनी अंगावर घेतला. इकडे शहा कमिशनच्या चौकशीचा फेरा चालू आहे... बदनामी सुरू आहे.. ‘इंदिरा गांधी यांना फासावर द्या...’ अशा घोषणाही कोर्टात दिल्या गेल्या आहेत. आणि अविचल मनाने इंदिराजी पुन्हा लोकांमध्ये उभ्या आहेत. किती कणखर मानसिकता असेल, याची कल्पनाही करता येत नाही... सगळे जग विरोधात गेले आहे... स्वत:चा धाकटा मुलगा अपघातात गमावलेला आहे...  मोठ्या मुलाला राजकारणाचा अनुभव नाही...  एक सून विरोधात आहे... एक सून भांबावलेली आहे... एका अर्थाने त्या घरात हिमत्तीने उभे राहिलेल्या एकट्या इंदिराजी आहेत. 

पण लोक त्यांच्यासोबत आहेत. याची त्यांना खात्री पटली आहे. कारण, मनाने त्या निर्मळ आहेत. देशभक्त आहेत. सूडाचे राजकारण त्या करू इच्छित नाहीत. लोकशाहीच्या कायदेशीर मार्गानेच त्यांनी आणीबाणी आणली. आणि लोकशाहीच्या मार्गानेच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या. स्वत: लोकांपर्यंत गेल्या.

महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे की, तो दिवस आठवा... २३ जानेवारी १९७८. इंदिराजी नागपूरला आल्या. कस्तुरचंद पार्कवर प्रचंड सभा झाली. सत्ता गमावलेल्या इंदिराजींनी घोषणा केली... 
‘हारे तो क्या हुआ...   

 
फिर जीत जाऐंगे...’
 २४ जानेवारी १९७८ ला नागपूरहून त्या पवनार येथे विनोबाजींना भेटायला गेल्या. त्यावेळी  रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करीत होते.  अनेक ठिकाणी त्यांची जीप थांबत होती. वयोवृद्ध... पुरुष-स्त्रिया त्यांना हार घालीत होते... ‘तुम्हाला मत दिले नाही, याबद्दल आम्हाला माफ करा....’ असे आगतिक आवाजातील आपले दु:खही अनेकजण व्यक्त करत होते. पवनारपर्यंत किमान ३ ते ४ लाख लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते. या दौऱ्याची सुरुवात होताना इंदिराजींच्या साधेपणाची एक जबरदस्त आठवण आहे...  पवनारला रवाना होण्यापूर्वी इंदिराजींसोबत आयुष्यभर राहिलेले ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या घरी इंदिराजी न्याहरीसाठी आल्या होत्या. त्यावेळी नागपूरचे काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांनी त्यांची लाल शेवरलेट गाडी इंदिराजींकरिता पवनारला जायला रहाटे कॉलनीत आणून ठेवली होती. या गाडीत इंदिराजी बसणार नाहीत... असा अंदाज आल्यामुळे बाबूजींच्या सांगण्यावरून लोकमतच्या वितरण विभागाची एक जीप सजवून तयार ठेवली होती. न्याहरी आटोपून इंदिराजी बाहेर आल्या... त्या लाल गाडीत बसण्याचे त्यांनी नाकारले... त्यांना जीपचा पर्याय दाखवला तेव्हा त्या अगदी सहजपणे म्हणाल्या, ‘हाँ... जीप बिलकुल ठीक हैं....’ त्या जीपमध्ये उभा रािहल्या... त्यांच्यासोबत जांबुवंतराव धोटे उभे होते.. समोर ५० मोटारसायकलस्वारांची व्यवस्था जांबुवंतरावांनी केली होती.  पवनारला जायला साधारण सव्वातास लागतो... रस्त्यावरील गर्दीमुळे साडेचार तास लागले. विनोबाजींची भेट झाली... तिथे तिसरे कोणीही नव्हते... पण भेटायला जाण्यापूर्वी आणि त्या भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील सर्व भावना विलक्षण बदललेल्या होत्या. एक नवी ऊर्जा घेवून त्या पवनार आश्रमातून बाहेर पडल्या. बाहेर हजारो लोक उभे होते. हात  उंचावून त्या म्हणाल्या... ‘कल नागपूर में मैंने जो कहा... वही दोहराती हूँ... ’
‘हारे तो क्या हुआ...
फिर जीत जाऐंगे...’

इंदिराजींची जीप नागपूरकडे निघाली. त्या जीपच्या मागे हजारो लोक धावत होते. प्रचंड धुरळा उडाला होता... त्या प्रचंड धुरळ्यातही इंदिराजींचा निर्धार झाकोळला गेला नाही...  इंदिराजींच्या ३९ व्या स्मृतिदिनाच्या दिवशी (३१ अॉक्टोबर) महाराष्ट्रातल्या काँग्रेसने येणाऱ्या निवडणुकीत तोच निर्धार व्यक्त करावा. गावागावांत काँग्रेस आहे... काँग्रेसचा विचार आहे... काँग्रेसचा कार्यकर्ता आहे... काँग्रेसचा झेंडा आहे. नेते तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत... महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ म्हणावेत, असे इनमीन पाच-दहा नेते आहेत. या पाच-दहा नेत्यांनी आता इंदिराजींचा मंत्र लक्षात ठेवावा...  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत... त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही लढाई लढायची आहे... अध्यक्षपदी खरगेसाहेब आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब हे जरी राष्ट्रवादीचे नेते असले तरी ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. त्यांच्यासोबतच सुशीलकुमार शिंदेही ज्येष्ठ नेते आहेत. तेव्हा नाना पटोले, पृथ्वीराज बाबा, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार, नितीन राऊत, विश्वजीत कदम, अमित देशमुख महिलांमध्ये यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड हे आणि असे सगळे नेते... यांनी एकच निर्धार केला पाहिजे, जिंकायचे असेल तर ‘तू ... का मी...’ हे आता पुरे झाले... पहिल्यांदा पक्षाला  विजय मिळवून द्या... मतदारांना नेत्यांच्या नावामध्ये फारसा रस नाही. या देशातील आणि राज्यातील लोकशाही टिकवण्यात आणि सर्व जाती-धर्मांना, समाजाला बरोबर घेवून जाण्यात महाराष्ट्राचे मोठेपण आहे. हे एकदा समजून घ्या. महाराष्ट्र जिंकला तर देश जिंकणार आहे. इंदिराजी म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे... 

‘हरलो म्हणून काय झाले... पुन्हा जिंकू’ पण त्यासाठी लोकांपर्यंत जायला पाहिजे. या राष्ट्रमातेचे स्मरण करताना हाच मंत्र लक्षात ठेवा... शिवाय काँग्रेस  हा एकच पक्ष नाही... आता ‘महाविकास आघाडी’ हा ही आपलाच पक्ष आहे... तेव्हा सगळ्यांना हातात हात घालून काम केले तर वातावरण अनुकूल आहे... आता नाही तर पुन्हा कधीच नाही... हेही समजून घ्या... 
इंदिराजींना आदरांजली... 
सध्या एवढेच📞9892033458

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.