सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राजीनामा द्यावा लागणार?
मुंबई :- राज्यात ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर गेल्या 48 तासात नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.रुग्णालयातील औषधोपचाराच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनांनंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेते सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली जात आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटले की, “कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.“महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही… अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!”असे ठाकरे म्हणाले
नाना पटोले काय म्हणाले ?
काॅंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ठाण्यातील घटनेवरून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला नाही. नांदेड येथील रुग्णालयामध्ये 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, जाहिरातबाजीसाठी, आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? हे सरकारी अनास्थेचे बळी असून 302 चे गुन्हे दाखल करा.
शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झालेत नाना पटोले
नाना पटोले म्हणाले, राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झालाय. संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी. शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले आहेत.
सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी :-नाना पटोले
ठाणे शासकीय रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री 18 मृत्यू झाले, त्यावर चौकशी समितीचे काय झाले? एकाद्या डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचाऱ्याला निलंबित करुन हे प्रकार थांबणार नाहीत. संबंधित मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे मृत्यू होत असताना संबंधित खात्याचे मंत्री काय करतात? मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे नाना पटोले म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले ?
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
असंवेदनशील सरकारचा ‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ हा दृष्टिकोन राज्याच्या हिताचा नाही. राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. ठाण्यातील रुग्णालयात १८ रुग्णांचा एका दिवसात मृत्यू झाल्यानंतर आता विष्णुपुरी, नांदेड येथे एकाच दिवसात २४ जण दगावले आहेत. औषधे वेळेवर न मिळाल्याने किंवा उपलब्धच नसल्याने हे मृत्यू झाले असल्याचे पिडितांचे नातेवाईक सांगतात.रूग्णालयात औषधांचा मुबलक साठा असावा. श्वानदंश तथा सर्पदंशावरील औषधे उपलब्ध असावी अशी मागणी मी वारंवार केली आहे. तरीही राज्यातील बहुतेक शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा असल्याचे आणि डॉक्टर्स उपलब्ध नसल्याचे माध्यमातून आलेल्या बातम्यांतून तसेच नागरीकांच्या तक्रारीवरुन दिसते. याचा अर्थ राज्यकर्त्यांचे नागरीकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष नाही.नागरीकांच्या किमान हितासाठी त्यांनी काम करणे आवश्यक आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यूमुळे या सरकारला वेदना होत नसतील तर हि बेसिकातच गफलत म्हणावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. या घटनांची निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. कारण राज्यकर्त्यांना निवडून देणाऱ्या मायबाप जनतेचे जीव एवढे स्वस्त नक्कीच नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.