Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नार्वेकरांनी शिंदेंना बंद दाराआड भेटणे म्हणजे न्यायाधीशाने आरोपीस भेटणे! विधानसभा अध्यक्षांची कृती बेकायदा

नार्वेकरांनी शिंदेंना बंद दाराआड भेटणे म्हणजे न्यायाधीशाने आरोपीस भेटणे! विधानसभा अध्यक्षांची कृती बेकायदा


महाराष्ट्राच्या विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी खटला चालू आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेऊन न्याय करायचा आहे. या परिस्थितीत नार्वेकर यांनी शिंदे यांना त्यांच्या घरी जाऊन भेटणे म्हणजे न्यायाधीशाने आरोपीस भेटण्यासारखे आहे. विधानसभा अध्यक्षांची ही कृती घटनात्मकदृष्टय़ा चुकीची आणि बेकायदेशीर आहे, असे परखड मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. याबाबत बोलताना उल्हास बापट म्हणाले, अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही. विधानसभा अध्यक्ष पदावर बसणारी व्यक्ती ही कुणा एका पक्षाची नसते तर तटस्थ असते. या पदावरील व्यक्तीने तटस्थपणे एक पंच म्हणून काम करणे अपेक्षित आहे. 

त्यामुळे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडे अध्यक्षांनी जाणे पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्ष असतो तो संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये कायदे मंडळातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती प्रामुख्याने सभागृहाचे प्रतिनिधीत्व करत असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 1958 मध्ये विठ्ठलभाई पटेल लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना पंडित नेहरू यांच्या विधानाचा बापट यांनी दाखला दिला. `Speakers must be of outstanding ability and outstanding impartiality ' म्हणजेच सभागृहाच्या अध्यक्षांनी बिनतोड आणि निष्पक्ष असले पाहिजे, असे नेहरूंचे म्हणणे होते. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे असे घडत नाही, असे उल्हास बापट म्हणाले.

इंग्लंडमध्ये अध्यक्ष झाल्यावर त्या पदावर बसणारी व्यक्ती ही राजकीय पक्षाचा राजीनामा देतो आणि एक पंच म्हणून काम करायला लागते. पण आपल्याकडे अध्यक्ष हे राजकीय पक्षाचे सदस्य राहतात आणि पक्षाच्या दबावाखाली ते काम करताना दिसतात, असे बापट म्हणाले.

- विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला जाणे घटनेच्या तत्त्वात बसत नाही. मुख्यमंत्री हा कोणत्या ना कोणत्या पक्षाचा सदस्य असतो आणि अध्यक्ष पदावरील व्यक्ती ही तटस्थ असते. त्यामुळे जर भेटायचंच असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे जाणं आवश्यक आहे. येथे गंगा उलटी वाहताना दिसली.

- महाराष्ट्र विधानसभेत पक्षांतर बंदीचा खटला सुरू आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याचा आणि ते आमदार म्हणून अपात्र असल्याचा आरोप आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे अध्यक्षांनी पंच म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे जाणे म्हणजे आरोपीकडे जाण्यासारखे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.