वसगडेत पुतण्याचा काकावर चाकूने खुनी हल्ला!
सांगली : वसगडे (ता. पलूस) येथे वडिलांना शिव्या घालणाऱ्या मुलाला जाब विचारणाऱ्या काकावर पुतण्यानेच चाकूने गळ्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कऱ्याप्पा मडाप्पा दुधाळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुडाप्पा मडाप्पा दुधाळे यांनी फिर्याद दिली आहे. दुधाळे कुटुंबिय वसगडे येथील नवीन वसाहत येथे राहतात. गुरुवारी रात्री किरकोळ कारणावरून कऱ्याप्पा त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत होता. त्यांचा आवाज ऐकून त्याचे चुलते लक्ष्मण दुधाळे तेथे आले. त्यांनी कऱ्याप्पाला वडिलांना शिव्या देऊ नकोस असे सांगितले.
त्यानंतर कऱ्याप्पा याने चुलते लक्ष्मण यांना तुम्ही येथे रहायचे नाही, तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणे होतात असे म्हणाला. नंतर त्याने खिशातील चाकू काढून लक्ष्मण यांच्या गळ्यावर जोरदार वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर कऱ्याप्पा याचा भाऊ दुडाप्पा याने शुक्रवारी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कऱ्याप्पा याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.