Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील 'त्या' हवालाफेम नगरसेवकावर कठोर कारवाई होणार

सांगलीतील 'त्या' हवालाफेम नगरसेवकावर कठोर कारवाई होणार


कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स घोटाळ्याची चौकशी करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांतील सुमारे 1,700 कोटींहून अधिक रकमेच्या घोटाळ्याची चौकशी करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन तपास अधिकारी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर एल. एल. पी. कंपनीविरोधी कृती समितीने केलेले आरोप गंभीर आणि पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेशी निगडित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधी रुपये हवालामार्फत परदेशात पाठविणार्‍या सांगलीतील 'त्या' स्वीकृत नगरसेवकासह मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार याच्या संपर्कातील चारही एजंटांकडे फेरचौकशी करण्यात येईल. तपासाच्या नावाखाली कर्तव्याशी प्रतारणा आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचा विश्वासघात करणार्‍या कोणत्याही घटकांना अजिबात थारा दिला जाणार नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून ते आजवर झालेल्या तपासाचा पूर्णत: आढावा घेण्यात येत आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

गुन्ह्याचा तपास करणारे शाहूपुरीचे तत्कालीन निरीक्षक राजेश गुरव, सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी या प्रकरणात आजवर किती कोटींची मालमत्ता, दागिने, शेतजमिनी, प्लॉट, फ्लॅटचा छडा लावला, किती संशयितांकडे चौकशी केली, किती जणांच्या साक्षी नोंदविल्या, याचाही आढावा घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

एल. एल. पी. कंपनीविरोधी कृती समितीने तपासाच्या कार्यपद्धतीबाबत केलेले आरोप गंभीर आहेत. पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेशी निगडित असल्याने आरोपांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. तक्रारीतील सर्वच बाबींची शहानिशा करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अहवालही लवकर अपेक्षित आहे. दोषी ठरणार्‍या घटकांविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

ए. एस. ट्रेडर्स कंपनीतील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, गुन्ह्याच्या संबंधित कोणतीही कागदपत्रे अद्याप त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली नाहीत, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, तपासाची कागदपत्रे तत्काळ संबंधितांकडे हस्तांतरण न केल्यास संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगलीतील 'त्या' हवालाफेम नगरसेवकावर कठोर कारवाई होणार

ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधी रुपये एजंटामार्फत हवालामार्गे परदेशात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत आपण स्वत: खातरजमा करीत आहोत. तक्रारदार कृती समितीकडून त्याचा तपशील मागविला आहे. चौकशीत तथ्थ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तत्कालीन तपासाधिकार्‍यांनी संबंधितांकडे काय चौकशी केली आहे. याचीही माहिती घेण्यात येत आहे, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.