प्राध्यापिकेने शिवी, धमकी दिल्याने विद्यार्थिनीने मारली उडी!तासगावमध्ये प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल
सांगली : मैत्रीण आजारी आहे, तिला घरी जायचे आहे असे सांगण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्राध्यापिकेने शिवी देऊन धमकी दिली होती. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारल्याने ती जखमी झाली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री संबंधित प्राध्यापक महिलेवर शिवीगाळ, धमकी दिल्यासह बाल न्याय कायदा २०१५ चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तासगावचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीच्या पोटात दुखत होते. तिने पीडितेला वर्गात जाऊन बॅग घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार पीडिता बॅग घेण्यासाठी गेल्यानंतर संबंधित प्राध्यापिकेने तिला शिवीगाळ करून तिच्या अंगावर धावून आल्या. नंतर पीडितेची मैत्रीण बॅग घेण्यासाठी गेली असता संबंधित प्राध्यापिकेने तुझी बॅग देत नाही, काय करायचे ते कर अशी धमकी दिली, असे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक वाघ यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.