नांदेडमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; " रात्रीत परत 7 जणांचा मृत्यू ; मृत्यूची संख्या 31 वर " ; अशोक चव्हाण यांची माहिती
नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्यापाठोपाठ आता त्याच रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत एका रात्रीत आणखी ७ रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नांदेडचे आमदार अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात एक ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे. शंकरराव चव्हाण रुग्णालयात २४ रुग्ण दगावल्याची बाब सोमवारी उघड झाली. एका दिवसात इतके रुग्ण दगावल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. औषधांच्या तुटवड्यामुळे आपले रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांकडून केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे काहीही नसून गंभीर आजार असणारे रुग्ण दाखल झाले, त्यांच्यावर पूर्ण उपचार केले मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. तर आता रात्रीपासून ते आतापर्यंत आणखी ७ रुग्णांचा मृ्त्यू झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
"नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान चालूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी", अशी पोस्ट अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात एकवृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. "आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय अधिष्ठात्यांनीच आमच्या लोकांना दिली आहे. झालं ते गंभीरच आहे. पण आत्ता गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना वाचवायला हवं. शासनाकडून त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला हव्या. पण शासकीय पातळीवर ही इच्छा दिसत नाहीये", असा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी केला."अतिशय गंभीर स्थिती आहे. मला राजकीय टीका-टिप्पणी करायची नाहीये. पण शासनाकडून कोणताही प्रतिसाद दिसत नाहीये. असा निष्काळजीपणा लोक सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त निर्देश देऊन चालणार नाही. कोरोना काळात ज्या प्रमाणे युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात आली, तेवढीच तीव्रता आत्ताही आहे", असेही त्यांनी येवेळी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.