शासकीय नोकरीच्या अमिषाने 6 जणांना 86 लाख 90 हजारांचा गंडा ; शकंर पाटील आणि सौरभ शंकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
सागंली : शासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सहा जणांना तब्बल ८६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अभिषेक पांडुरंग खंडागळे (रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी सौरभ शंकर पाटील (वय ३०) आणि त्याचे वडील शंकर रामचंद्र पाटील (६०, रा विठाईनगर, बालाजीनगर, सांगली) यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आमची वरिष्ठ पातळीवर चांगल्या ओळखी असून, त्याद्वारे नोकऱ्या लावतो, असे आमिष संशयितांनी दाखविले होते. फसवणूक झालेल्यांमध्ये पौर्णिमा तुषार पवार, पूजा झेंडे (रा. झेंडे गल्ली, कवलापूर), संग्राम वसंतराव सोनवणे (रा. वल्लभनगर, पुणे), विनायक उदय नागावे, शुभम उदय नागावे, महेश पाटील यांचा समावेश आहे. ५ मार्च २०१५ ते दि. ४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फसवणूक झालेल्या सर्वांशी संपर्क साधून संशयितांनी शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. संशयित पाटील पिता-पुत्रांनी सहा जणांकडून ऑनलाईन तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे घेतले. त्यांनी पैसे देऊनही त्यांच्या नोकरीचे काम झाले नव्हते. याबाबत ते वारंवार पाठपुरावा करत होते.
पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नाही आणि पैसेही परत मिळत नाहीत, हे समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाटील पिता-पुत्राकडे पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी धमकी देत शिवीगाळ केल्याचेही खंडागळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. विश्रामबाग पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.