दिल्लीत 25 कोटींचे दागिन्यांवर डल्ला मारणारा मास्टरमाईंड निघाला महाराष्ट्राचा, अशी झाली अटक
दिल्लीतील जंगपुरा भागातील भोगल मार्केटमधील उमरावसिंग ज्वेलर्सच्या दुकानातील तब्बल 25 कोटींचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरीचा मास्टरमाईंड लोकेश श्रीवास हा देखील पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. लोकेशवर तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड अशा विविध राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दिल्लीच्या जंगपुरा भागातील भोगल मार्केटमध्ये दागिन्यांचे अनेक मोठ्या आणि आलिशान शोरूम आहेत. त्यापैकी एक शोरूम म्हणजे उमरावसिंग ज्वेलर्स. या उमरावसिंग आणि महावीर प्रसाद जैन यांच्या मालकीचे आहे. भोगलचा हा बाजार आठवड्यातून एकदा सोमवारी बंद राहतो. रविवार (24 सप्टेंबर 2023) रोजी दिवसभराच्या कामकाजानंतर रात्री आठच्या सुमारास ही शोरूम बंद करण्यात आली. मात्र एका दिवसानंतर म्हणजे मंगळवार (26 सप्टेंबर 2023) रोजी सकाळी 10.30 वाजता शोरूमचं कुलूप उघडलं असता, आतील दुरवस्था पाहून शोरूमच्या मालकासह उपस्थित कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नेमकं काय घडलं?
चोरट्यांनी शोरूममधील संपूर्ण मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी दुकानातील कपाट व शो केसेसमध्ये ठेवलेले दागिने तसेच शोरूममधील स्ट्राँग रूम फोडून मौल्यवान हिरे व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. हा मुद्देमाल जवळपास 25 कोटी रुपयांहून अधिक होता. या चोरीबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अलीकडच्या काळात दिल्लीत झालेल्या सर्वात मोठ्या चोरीपैकी ही चोरी असल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला होता.
चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे केले होते नुकसान
चोरी होऊ नये, म्हणून या शोरूममध्ये एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. चोरट्यांनी या सहाही कॅमेऱ्यांचे केवळ नुकसानच केले नाही तर त्यांच्या वायर्सही काढल्या. शोरूमच्या तळमजल्यावर चोरट्यांनी ज्या स्ट्राँग रुमला लक्ष्य केले होते, त्या स्ट्राँग रूमला तीन बाजूंनी काँक्रीटची भिंत आणि एका बाजूला मजबूत लोखंडी दरवाजा आहे. मात्र चोरट्यांनी एका रात्रीत सुमारे दीड फूट रुंदीच्या स्ट्राँग रुमची भिंत सहज फोडून स्ट्राँग रुमच्या विविध 32 लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरून नेले.चोरीनंतर शोरूममधील दृश्य पाहून मालकाच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस आल्यावर त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 30 किलो सोन्याचे दागिने, लाखो रुपये किमतीचे मौल्यवान हिरे आणि 5 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. शोरूमचे मालक महावीर प्रसाद जैन यांना या घटनेबाबत काही संशय आहे का, असे पोलिसांनी विचारले असता, त्यांनी 'नाही' असे सांगितले. उलट येथे काम करणारे सर्व कर्मचारी वर्षानुवर्षे काम करत आहेत, त्यामुळे यापैकी कोणावरही संशय घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
तीन मजली आहे शोरूम
ज्या शोरूममध्ये चोरी झाली, ते शोरूम तीन मजली आहे. घटनास्थळावरील दृश्य पाहता चोरट्यांनी छतावरून शोरूममध्ये प्रवेश केल्याचा पोलीस आणि शोरूम मालक दोघांचाही अंदाज आहे. शोरूमच्या तळमजल्यावर मुख्य व्यवसाय आहे, जिथे दागिन्यांची खरेदी-विक्री होते, त्याच मजल्यावर एक स्ट्राँग रूमही बांधली आहे, जी गरजेनुसार उघडली आणि बंद केली जाते. तर वरच्या तीन मजल्यांवर डिझाईन आणि दुरुस्तीचे काम करण्यात येते.
चोरीची घटना उघडकीस आली तेव्हा शोरूमचे कुलूप समोरून पूर्णपणे शाबूत होते. बाहेरील भिंतीही शाबूत होत्या. त्यामुळे चोरट्यांनी छतावरूनच आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी शोरूमच्या मालकाला टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आता चोरटे शोरूमच्या छतापर्यंत कसे पोहोचले, असाही प्रश्न उपस्थित होत असल्याने पोलीस ही शक्यताही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चोरट्यांनी आधी जवळच असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या छतावर आणि नंतर तेथून शोरूमच्या छतावर प्रवेश केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले चोर
शोरूममध्ये प्रवेश करताच चोरट्यांनी केवळ सीसीटीव्हीच नाही, तर सर्व वायफाय वायरही तोडली होती. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच तपास सुरू केला. पोलिसांना शोरूममध्ये तीन मास्क घातलेल्या व्यक्तींनी प्रवेश केल्याचे दिसले, जे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होण्यापूर्वी त्यात कैद झाले होते. याशिवाय, पोलिसांनी जवळपासच्या दुकानांमध्ये लावलेल्या आणखी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आणखी काही संशयित लोक दिसले. हे फुटेज रविवारी ( 24 सप्टेंबर 2023) रात्री 11.30 च्या दरम्यानचे असून ते पाहून ही चोरी रात्री 11.30 ते 12.00 च्या दरम्यान झाल्याची खात्री पोलिसांना पटली. रविवारी रात्री बाजारात एक टाटा सुमो कार संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना दिसली. चोरटे या कारमध्ये बसून गुन्हा करण्यासाठी आले असावेत, असा संशय पोलिसांचा आहे.दुसरीकडे, शोरूमच्या मालकाला त्याच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर संशय नसला तरी शोरूममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय अशी घटना घडू शकत नाही, असं पोलिसांना वाटते. कारण चोरट्यांनी ज्याप्रकारे छतावरून शोरूममध्ये प्रवेश केला, स्ट्राँग रूमची भिंत फोडून दागिने नेली, हे काम एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय करणे शक्य नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कर्मचारी, नातेवाईक किंवा ग्राहक ज्याला दुकानाच्या आतील गोष्टींची पूर्ण माहिती आहे, अशी व्यक्ती या चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे सध्या सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत.
चोरीचा मास्टरमाईंड पकडण्यात पोलिसांना यश
दरम्यान दिल्लीतील 25 कोटी रुपयांच्या चोरीच्या या प्रकरणातील चोरटे पकडण्यात ही पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड पोलिसांनी या चोरीच्या सर्वात मोठ्या घटनेचा मास्टरमाइंड लोकेश श्रीवास यालाही अटक केली आहे. लोकेश हा किरकोळ चोर नाही. याआधीही त्याने मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. त्याचा गुन्हेगारी इतिहास खूप जुना आहे. लोकेशला चोरांचा म्होरक्या म्हणून ओळखले जाते. लोकेश वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने छत्तीसगडमध्येच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळेच त्याच्यावर तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड मध्ये यापूर्वीच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
भिलाई येथे केली अटक
पोलीस तपासादरम्यान असं आढळून आले की, 10 दिवसांपूर्वी लोकेश याने छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील स्मृती नगर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर एक खोली भाड्याने घेतली होती. दरम्यान, बिलासपूर पोलिसांनी त्याचा कवर्धा येथून पाठलाग सुरू केला होता. भिलाई येथे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. आता तो छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं आहे की, 2019 मध्ये पारख ज्वेलर्समध्ये झालेल्या 5 कोटी रुपयांच्या चोरीच्या घटनेचा मास्टरमाईंड लोकेश श्रीवास हाच होता. तिथेही त्याने चोरीचे तेच तंत्र अवलंबले जे त्याने दिल्लीत वापरले आहे. दरम्यान, दिल्लीतील कोट्यावधीच्या चोरीचा उलगडा झाल्याने आणि आरोपी लोकेश श्रीवास याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.