आंध्र रेल्वे अपघात; मृतांचा आकडा वाढला, रेल्वेसेवा विस्कळीत; 22 ट्रेन रद्द
विजयवाडा, 30 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दोन ट्रेनची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून ३२ जण जखमी झाले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, विशाखापट्टणम पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम रायगढा पॅसेंजर ट्रेन एकमेकींना धडकल्या.
या घटनेत तीन डब्यांचे नुकसान झाले. मंडल रेल व्यवस्थापक सौरभ प्रसाद घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला घटनेची माहिती देऊन बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी एम्ब्युलन्स आणि मदतीसाठी रेल्वेगाड्या दाखल झाल्या. दरम्यान, यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून २२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर १८ ट्रेनचे मार्ग बदलेले आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या ट्रेनने मागून धडक दिली तिच्या चालकाने सिग्नल चुकवला होता. चालकाने लाल सिग्नल पार केला आणि मागून धडक दिली. पुढे जात असलेली लोकल ट्रेन खूपच कमी वेगात धावत होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना बचावकार्य वेगाने राबवण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांना जखमी लोकांना नेण्यासाठी एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यास सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती रेल्वेमंत्र्यांना दिली. शिक्षणमंत्री बी सत्यनारायण, जिल्हाअधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.
रेल्वेकडून रविवारी झालेल्या अपघाताबाबत माहिती देताना सांगितलं की, हावडा चेन्नई मार्गावर विजयनगर जिल्ह्यात रेल्वे दुर्घटना घडली. ही दुर्घटना मानवी चूक आणि सिग्नलकडे दुर्लक्ष या कारणामुळे झाल्याची शक्यता आहे. इस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजित साहू यांनी सांगितलं की, अपघाताचे संभाव्य कारण मानवी चूक आणि विशाखापट्टणम रायगढा पॅसेंजर ट्रेनच्या सिग्नल ओव्हरशूटिंगमुळे झाल्याची शक्यता आहे. ओव्हरशूटिंबाबत सांगताना सीपीआरओने सांगितलं की, एखादी ट्रेन लाल सिग्नलवर न थांबता पुढे जाते तेव्हा ओव्हरशूटिंग होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.