कोल्हापुरात शासकीय रुग्णालयात सप्टेंबरमध्ये 228 रुग्णाचा मृत्यू; मृतांमध्ये 29 बालकांचा समावेश
कल्याणपाठोपाठ नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात रुग्ण दगावण्याची संख्या वाढल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था रामभरोसे सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यात थोरला दवाखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) सप्टेंबर महिन्यात तब्बल 228 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 29 बालकांचाही समावेश आहे. येथे औषधांचा साठा पुरेसा असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मृत्यूचा हा अहवाल पाहिल्यास या रुग्णालयात दिवसाला सात ते आठजणांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे.
महिन्याभरापूर्वी ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत नांदेडमधील रुग्णालयात दोन दिवसांत 35 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱयाच दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही 18 जणांचा मृत्यू झाला. पाठोपाठ नागपूर रुग्णालयातही 25हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याने याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचा आढावा घेतला असता, येथे औषधसाठा पुरेसा असूनही गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये तब्बल 228 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालावरून दिसून आले आहे. जिह्यातील बाराही तालुक्यांतील शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातील अतिगंभीर रुग्णांना अखेरच्या क्षणी सीपीआरला उपचारासाठी पाठवले जाते.
दरम्यान, सीपीआरमधील हे सर्व 228 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेणारे होते. सर्वसाधारण वॉर्डमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच येथे औषधसाठा पुरेसा आहे. अतिगंभीर रुग्णांना शेवटच्या टप्प्यात सीपीआरमध्ये दाखल केल्यामुळे मृतांची संख्या जास्त असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.