"आता 200 नाही, 400 कोटी द्या, नाहीतर..."; मुकेश अंबानींना तीन दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. मुकेश अंबानी यांना तीन दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलमधून पुन्हा एकदा मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेमध्ये अज्ञातांनी खंडणीची रक्कम वाढवून मागितली आहे. आधीच्या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्यांनी 200 कोटींची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर खंडणीची रक्कम 400 कोटींपर्यंत वाढवून मागण्यात आली आहे.
आरोपीनं धमकी देणाऱ्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिलं आहे की, "आता 400 कोटी रुपये वाढवून मागितले आहेत. जर पोलीस माझा शोध घेऊ शकत नाहीत, तर ते मला अटकही करू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास काहीच अडचण नाही, मग तुमची कितीही चांगली सुरक्षा असली तरीही. आमचा एकमेवर स्नायपर आहे, तो तुम्हाला मारू शकतो."
दुसऱ्या ईमेलमध्ये आरोपींनी 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि आधीच्या ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्याच ईमेल खात्यावरून मुकेश अंबानींच्या ईमेल आयडीवर आणखी एक ईमेल आला ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, "तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही, आता रक्कम 200 कोटी आहे, नाहीतर मृत्यू अटळ आहेच."
यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. ज्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत तर आपला जीव गमवावा लागेल, असं म्हटलं होतं. आधीच्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहे." धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही मुकेश अंबानींना आलेली धमकी
यापूर्वी सुद्धा अनेकदा अंबानी कुटुंबांना असे धमकी कॉल्स आणि ईमेल आलेत. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
त्यानंतर ऑगस्ट 2022 ला देखील मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आतंकवादी अफजल गुरु आहे असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर विष्णू बिंदू भूमिक या 56 वर्षीय आरोपीला बोरीवलीमधून ताब्यात घेण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.