धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयाच्या गेटजवळच 2 कोटींचे ड्रग्स सापडले
पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात खून, मारामारी, हल्ले, आम्ली पदार्थांचे सेवन असे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात ड्रग्सच्या कारवायांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसात पुणे पोलिसांनी कारवाया करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. जप्त केलेल्या MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे.
हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. ललित पटेलला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.