औषध दुकानांमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक
सांगली, दि. 4, : Schedule H, HI व X औषधाची विक्री करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 133 अन्वये प्राप्त अधिकारानुसार निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, लहान मुलांना Schedule H, HI व X औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज मिळतात त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने ही मुले औषधांवर अवलंबून राहतात. सध्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यामध्ये तरतुदी आहेत. तथापी त्यावर मजबूत देखरेख यंत्रणा व अहवाल प्रणाली विकसीत करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी Schedule H, HI व X औषधाची विक्री करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावणे अनिवार्य आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, बाल कल्याण पोलीस अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील. नियमावलीप्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, औषध निरीक्षक व बाल कल्याण पोलीस अधिकारी यांना असतील. औषध आस्थापनांनी आवश्यकतेप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज संबंधित सक्षम प्राधिकारी यांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.