बांग्लादेशमध्ये डेंग्यूने 1000 जणांचा मृत्यू
भारताचे शेजारी राष्ट्र बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजाराची साथ आली आहे. ज्यामुळे आतापर्यंत जवळपास 1000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अवघ्या 24 तासांमध्ये तब्बल 3000 नागरिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. COVID-19 नंतर अवघ्या काहीच महिन्यांमध्ये सन 2023 या वर्षात या देशात आलेली ही सर्वांत मोठी महामारी किंवा सर्वात प्राणघातक संकट म्हणून पाहिले जात आहे. देशाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने माहिती देताना सांगितले की, सबंध देशभरात 2,00,000 (दोन लाख) नागरिकांना या आजाराची लागण या वर्षात झाली.
सन 2023 या वर्षातील एकूण तपशील पाहिला तर बांग्लादेशमध्ये आतापर्यंत जवळपास 1,017 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा या वर्षातील केवळ पहिल्या नऊ महिन्यांतील आहे. तसेच, वेगवेगळ्या सूत्रांकडून वेगवेळे आकडे येत आहेत. काही माध्यमांनी दावा केला आहे की, देशात सध्या 209,000 नागरिकांना डेंग्यू आजाराची बाधा झाली आहे. आकडे थोड्याफार फरकांनी वेगवेगळे असतील तरी बाधितांची संख्या सांगणारे सर्वच आकडे दोन लाखांच्या पुढे आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये 115 मुलांचा समावेश आहे. ज्यांचे वय 15 वर्षांपेक्षाही कमी आहे. अशियाई देशांमध्ये दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यामुळे त्यामुळे जागा रिकाम्या करणे आणि मोगळ्या हवेच्या जागांवर रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
डेंग्यू हा उष्णकटिबंधीय भागात उद्भवणारा स्थानिक आजार आहे. ज्यामुळे जास्त ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायू दुखणे आणि सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव होतो ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, डेंग्यू आणि डासांपासून पसरणारे इतर रोग, जसे की चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका, हवामान बदलामुळे वेगाने आणि पुढे पसरत आहेत. डेंग्यूवर विशेषत: उपचार करणारी कोणतीही लस किंवा औषध नाही. हा आजार दक्षिण आशियामध्ये जून-ते-सप्टेंबर या कालावधीत साधारण पावसाळ्यात वाढतो. हा आजार पसरवणारा एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. हा डास साचलेल्या पाण्यात वाढतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.