Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील बहे गावात 100 वर्षापासून स्मशानभूमीच नाही ,दहनावेळी नातेवाईकच भोगतायत मरण यातना

सांगलीतील बहे गावात 100 वर्षापासून स्मशानभूमीच नाही ,दहनावेळी नातेवाईकच भोगतायत मरण यातना


इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी बहे (ता. वाळवा) येथे कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. गावाचा चेहरा-मोहरा बदलला, असा स्थानिक नेत्यांचा दावा आहे; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून स्मशानभूमीच नाही, त्यामुळे पवित्र रामलिंग बेटाच्या परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते.

यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांना मरणयातना भोगाव्या लागतात. दिवंगत मंत्री यशवंतराव मोहिते दिवंगत मंत्री राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणेतून कृष्णा खोऱ्यात दोन साखर कारखाने उभे राहिले. याच माध्यमातून कृष्णा काठी वसलेल्या बहे गावाची प्रगती २१व्या शतकाकडे झेपावली; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून येथे स्मशानभूमीच नाही.

कृष्णेला पूर आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. यासाठी इस्लामपूर बहे रोडवर २००८ साली चार कोटी रुपये खर्च करून पूल उभा करण्यात आला. रामलिंग बेटाला पौराणिक इतिहास आहे. येथे ११ मारुतींपैकी एक देवस्थान आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही पर्यटनाला गती नाही.

गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने १०० वर्षांपासून नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते. पावसाळ्यात स्मशानभूमीमध्ये पाणी आल्यानंतर ग्रामस्थ पुलाच्या रस्त्यावरच दहन विधी उरकतात. यावेळी नातेवाइकांचे मोठे हाल होतात. उन्हाळ्यातही अशीच अवस्था असते. एकंदरीत २१व्या शतकाकडे झुकणाऱ्या गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

स्मशानभूमीसाठी जागा नाही हा दावा चुकीचा मानला जातो. आधुनिक काळात समुद्रातही मोठे पिलर्स उभे राहतात. नदीच्या पात्रातच पिलर उभे करून पुलाबरोबरीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभी राहू शकते. त्यामुळे रामलिंग बेटाच्या सौंदर्यातही भर पडेल.

तत्कालीन सरपंच छायाताई पाटील यांच्या कारकिर्दीत स्मशानभूमीसाठी २० लाख रुपये निधी आला होता. जागेअभावी हा निधी परत गेला. ग्रामस्थांच्या सोईसाठी स्मशानभूमी उभी करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत; परंतु, त्या परिसरातील नागरिकांनी सहकार्य केल्यास स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागेल. -विठ्ठल पाटील, संचालक- राजारामबापू पाटील साखर कारखाना

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.