नांद्रे येथे सख्ख्या भावाने केला भावाचा खूनदारूच्या कारणावरून कृत्य, संशयिताला अटक
सांगली : मिरज तालुक्यातील नांद्रे येथे सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली. भावाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून हे कृत्य केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय ३०) असे मृताचे नाव आहे. राहुल ऊर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (वय ३२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश यल्लाप्पा कुंभार (वय ६६) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश कुंभार पत्नीसह नांद्रे येथे कुंभार गल्लीत भाड्याच्या घरात राहतात. तर त्यांची दोन्ही मुले दारूच्या आहारी गेल्याने ती आई-वडिलांपासून वेगळी रहात होती.
संशयित राहुल याचा विवाह झाला होता. मात्र त्याची पत्नी गेल्या काही वर्षापासून विभक्त रहात आहे. दोन्ही भावांना दारूचे व्यसन होते. मजुरी करून येणाऱ्या पैशातून ते दारू पित होते. शिवाय दारूसाठी दोघेही आई-वडिलांना त्रास देत होते. बुधवारी रात्री दारूच्या व्यसनाच्या कारणावरून राहुल आणि दत्तात्रय यांच्यात वाद झाला. त्यावेळी ते दोघेही नशेत होते. त्यावेळी राहुलने लाकडी दांडक्यासह धारदार शस्त्राने दत्तात्रय याच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच सांगलीचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. त्यानंतर गुरुवारी पहाटे संशयित राहुल याला पोलिसांनी अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.