Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटील यांना मोठा धक्का! माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची अजित पवार यांच्या सभेला हजेरी

जयंत पाटील यांना मोठा धक्का! माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची अजित पवार यांच्या सभेला हजेरी 

इस्लामपूर : माजी मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील सभेला हजेरी लावली. अण्णा डांगे यांची उपस्थिती माजी मंत्री जयंत पाटील यांना धक्कादायक अशीच आहे. या उपस्थितीने वाळवा तालुक्यातील जयंत पाटील समर्थकांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या.

रविवारी रात्री कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विराट सभा झाली. व्यासपीठावर पहिल्या रांगेत अण्णासाहेब डांगे बसले होते.भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत अण्णा डांगे यांचे व्यक्तिमत्व घडले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षाचे ते काही काळ राज्य उपाध्यक्ष होते. शरद पवार यांनी त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष पदही दिले होते.

इस्लामपूरमध्ये डांगे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत काम करीत होते. पण अनेकदा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत असल्याचे जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले होते. रविवारी त्यांनी थेट कोल्हापूर येथे अजित पवार यांच्या सभेला हजेरी लावली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाला हसून खळखळून दाद देताना अण्णा डांगे दिसले. वाळवा तालुक्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांनी अजित पवार यांना साथ दिली नसल्याचा दावा फोल ठरला आहे. मंत्री हसन मुश्रीफ व स्वतःचे नाते कसे दृढ आहे. कोल्हापूर आणि बीडचा कसा संबंध आहे, हे धनंजय मुंडे भाषणात सांगत होते. तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात तर आम्ही ऊस तोडण्यासाठी येत असतो. तर सर्वाधिक भाव देणारे दादाच आहेत, असे सांगताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हसून दात देत होते.

वास्तविक जयंत पाटील यांच्या इस्लामपूर शहर व तालुक्यातील कोणत्याच कार्यकर्त्यांने किंवा नेत्याने उघडपणे अजित पवार यांची पाठराखण केलेली नव्हती. अजित पवार सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यात प्रवेश केल्यावर कासेगाव येथे भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वागत केले. पेठ नाक्यावर राहुल व सम्राट महाडीक यांनी स्वागत केले.



व्यासपीठावर पहिल्या पंक्तीत

जयंत पाटील समर्थक कोणीही स्वागतासाठी उपस्थित नसल्याने जयंत पाटील समर्थक खूश झाले होते. पण रात्री कोल्हापुरात माजी मंत्री डांगे यांनी अजित पवार यांच्या विराट सभेत व्यासपीठावर पहिल्या पंक्तीत हजरी लावल्याचे पाहिल्यावर जयंत पाटील समर्थकांना धक्का बसला. डांगे यांचा व्हिडिओ पाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राजकीय समीकरणे बदलणार ?

डांगे यांचे सुपुत्र चिमण डांगे माजी नगराध्यक्ष आहेत. ते जयंत पाटील यांच्या सोबत सतत सावली प्रमाणे असतात. तर डांगे यांचे दुसरे पुत्र विश्वास डांगे जयंत पाटील गटाचे माजी नगरसेवक आहेत. जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करीत असणाऱ्या डांगे कुटुंबातील अण्णासाहेब डांगे यांनीच अजित पवार यांची सोबत केल्याने वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ? याची उत्सुकता िनर्माण झाली अाहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.