दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने दुसरे लग्न करून, दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटसला ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली आहे. डॉ. आयशा शेख (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.
बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या युवतीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. पुढे पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले. त्यानंतर आयशा ही पतीचे घर सोडून माहेरी राहू लागली. पुढे प्रकरण न्यायालयात पोहचले. न्यायालयात वाद सुरु असतानाच डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबतच्या लग्नाचे छायाचित्र त्याने स्टेटसवर ठेवले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावाखाली होती. त्यामुळे मंगळवारी तिने वडिलांच्या राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. जैद याने दुसरे लग्न केल्याने आयशा तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी शहरातील सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.