Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जप्तीचे वॉरंट बजवायला लाच? तहसील कार्यालयातला अव्वल कारकून लाचलुचपत च्या जाळ्यात!

जप्तीचे वॉरंट बजवायला लाच? तहसील कार्यालयातला अव्वल कारकून लाचलुचपत च्या जाळ्यात!


राज्यातलं असं कोणतंही खात नाही, जिथे त्या खात्याच्या प्रमुखापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अजिबातच लाचखोरी नाही, मग अशावेळी साहेब भरमसाठ पैसे कमवताना पाहिल्यावर, शिपायांचा, कारकुनांचा तरी हात कसा गप्प बसेल? शिक्षणापासून सरकारी खात्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे अधिकारी तर लाच घेतातच, पण तक्रारीच्या प्रकरणातील जप्तीचे वॉरंट बजवायला सुद्धा लाच मागण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या तहसील कार्यालयातील ही घटना! रवी दशरथ सोनकांबळे या अव्वल कारकुनाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका बांधकाम व्यवसायिकाला जप्तीचं वॉरंट बजवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने बिल्डरविरुद्ध तक्रार करून 14 लाख रुपये रकमेसाठी जप्तीचे वॉरंट महारेराकडून मिळवले होते. या जप्तीच्या वॉरंटची बजावणी करण्यासाठी हे जप्ती वॉरंट या तक्रारदाराने रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. मग हे वॉरंट कर्जतच्या तहसील कार्यालयात पाठवण्यात आले.



या जप्ती वॉरंटची बजावणी करण्यासाठी तक्रारदाराकडून रवी सोनकांबळे यांनी वीस हजार रुपये आधीच घेतले होते आणि पुन्हा दहा हजार रुपयांची लाच मागितली. या सगळ्या प्रकरणामुळे कंटाळून जाऊन तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, अव्वल कारकून रवी सोनकांबळे याने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या पथकाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रवी सोनकांबळे याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे, अरुण करकरे, विनोद जाधव, शरद नाईक, महेश पाटील यांच्या पथकाने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.