Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत मराठा समाजाचे आंदोलन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत मराठा समाजाचे आंदोलन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

सांगली :  जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. याच्या निषेधार्थ शनिवारी सांगलीत सकल मराठा समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

अंतरावली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दिवसांपासून शांततेने आंदोलन केले जात होते. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला. यावेळी हवेत गोळीबार करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आली. यामध्ये अनेक आंदोलक, महिला, मुले जखमी झाली. या घटनेचा तीव्र निषेध सांगलीत व्यक्त करण्यात आला. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील, शंभोराज काटकर, प्रा. पद्माकर जगदाळे, शेखर माने, राहुल पाटील, नितीन शिंदे, नगरसेवक मयूर पाटील, शैलेश भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.