Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड, मुलुंडमध्ये गुजराती लोकांची दादागिरी

महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड, मुलुंडमध्ये गुजराती  लोकांची  दादागिरी 


मुलुंडमधील शिवसदन सोसायटीतील गुजराती लोकांनी त्या सोसायटीत मराठी माणसाला घर किंवा गाळा दिला जात नसल्याचे मुजोरपणे सांगत दादागिरी केली आहे. तृप्ती सागर देवरुखकर ही महिला तिच्या पतीसह या सोसायटीत गाळा बघायला गेली होती. त्यावेळी तिचा तेथील सदस्यांशी वाद झाला. त्या वादानंतर त्यांनी त्या महिलेचा फोन हिसकावून घेतला आणि तिच्या नवऱयाला धक्काबुक्की केली. तृप्ती यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

व्हिडीओ शेअर करत तृप्ती म्हणाल्या, मुलुंड पश्चिमेला शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा बघायला गेलो. तिथल्या सेव्रेटरीने सांगितले की, मराठी माणसांना त्या सोसायटीत जागा देत नाहीत. आम्ही कारण विचारले त्यावर ते हमरीतुमरीवर आले, दादागिरी करू लागले. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असे सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की, महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की, तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मग आम्ही गुजरातमध्ये जाऊन राहायचे का? हे आताच थांबले नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही, अशा शब्दांत तृप्ती यांनी संताप व्यक्त केला. तसेच आज मला अनुभव आला तो प्रातिनिधिक आहे. अशा कितीतरी मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरे नाकारली असतील? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

ही चीड आणणारी घटना आहे, पण प्रश्न हा आहे की, हे पाहून  शिंदे-फडणवीस सरकार काय करणार, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्या मराठमोळ्या वारकऱयांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठय़ा चालवल्या तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार की, दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवून गप्प बसणार? या बिल्डिंगवर कारवाई होणार का? उद्या बीएमसी आणि पोलीस पाठवणार का? की 'थॅंक यू' म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक 'इथे' दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना!, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. Maharashtrian Not Allowed अशी मुजोरी काही मंडळी येथे मुंबईमध्ये करत आहेत. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरवरून दिला आहे. यांच्यामागे कोणत्या शक्ती आहेत हे बघितले पाहिजे. पेंद्रातील भाजपा सरकार मुंबई मराठी माणसापासून परिणामी महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहे. राज्यातील येडय़ाचे सरकार हे दिल्लीश्वरासमोर झुकलेले आहे. मराठी स्वाभिमान जागृत ठेवून राज्य सरकारने या घटनेची चौकशी करावी आणि अशा घटना परत घडू नये याची काळजी घ्यावी, असेही पटोले म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.