Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निजामाचे निशाण खाली उतरले...विकासाची पताका कोण फडकवणार?- मधुकर भावे

निजामाचे निशाण खाली उतरले...विकासाची पताका कोण फडकवणार?- मधुकर भावे



दिनांक १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या टांचेखालील मराठवाडा आणि हैद्राबादमधील निजामाचे निशाण खाली उतरले आणि भारताचा तिरंगा फडकला. येत्या रविवारी या मुक्ती संग्रामाच्या लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १३ महिने दोन दिवसांनी मराठवाडा स्वतंत्र झाला आहे. या ‘मुक्ती स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव’ खरंतर महाराष्ट्रभर साजरा व्हायला हवा. कारण निजामाच्या विरुद्धचा हा लढा, त्यात काही प्रमुख नेते होते तरी, सामान्य माणसांनीच लढवला. आणि सरदार पटेल यांच्या कणखर धोरणामुळे निजाम शरण आला. तो सगळा इितहास जवळपास सगळ्यांना माहिती आहे. त्यावर अनेक पुस्तके आली. १७२४ पासून १९४८ पर्यंत निजामाचे राज्य मराठवाडा, त्यावेळचा तेलंगणा यावर २२५ वर्षे ही राजवट होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर हैद्राबाद संस्थानने भारतात सामील व्हायला विरोध केला. त्या सगळ्या लढ्यात १८ पगड जातीचे लोक सहभागी झाले होते. त्यामुळे हा मुक्ती लढा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढाचा महत्त्वाचा आहे. पण, महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य लढ्याचे कसलेही वातावरण नाही. खुद्द मराठवाड्यातही कसलाही उत्साह नाही. माझ्या आयुष्यातील उमेदीची दहा वर्षे खान्देशम, विदर्भ आणि मराठवाडा येथे पत्रकारिता करताना गेली. 

त्यामुळे या विभागातील प्रत्येक तालुका फिरलो आहे.  शिवाय हैद्राबादशी माझे नाते वेगळे आहे. माझे चुलत काका स्व. गजानन गणेश भावे हैद्राबादला स्थायिक झाले होते.  माझी पत्नी मंगला ही हैद्राबादची. आंध्रचे राज्यपाल भीमसेन साचार यांचे ‘पर्सनल फिजीशीयन’ असलेले डॉ. बी. एच. जोशी हे माझे सासरे. गेल्या ६५ वर्षांत हैद्राबादशी निकट संबंध आहेत. हा व्यक्तीगत संबंध वेगळा भाग आहे. पण, एकूणच हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा उत्साह मराठवाड्यात नाही... आणि तो का नाही..? निजामाचे निशाण ७५ वर्षांपूर्वी खाली उतरले. पण, गेल्या ७५ वर्षांत आंध्र, तेलंगणा ज्या झपाट्याने पुढे गेला त्या वेगात मराठवाड्यातील कोणता जिल्हा पुढे गेला? स्वातंत्र्याचा उत्साह का नाही? हा विषय प्रबंधाएवढा मोठा आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापूर्वी संभाजीनगरमध्ये  (औरंगाबाद) ‘मुक्ती संग्रामाची अस्मिता’ असे एक प्रदर्शन संभाजीनगर महापालिकेने आयाेजित केले आहे. हे शहर बावीस लाख एवढ्या लोकसंखेचे आहे... प्रदर्शनात २००० हजार लोकांचीही अजून भेट नाही. ‘स्वातंत्र्याची आस्मिता’ पहायचा उत्साह नाही. त्या प्रदर्शनात अभिप्रायासाठी एक वही ठेवली आहे. त्या वहीत २२ लाखाच्या शहरातील लोकांपैकी ३०० लोकांचे अभिप्राय कालच्या तारखेपर्यंत होते, असे अमजते. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मंत्रीमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये आहे... यापूर्वी अनेकवेळा या बैठका झाल्या. आता अमृत महोत्सवानिमित्त या बैठकांनंतर मराठवाड्यावर निधीचा वर्षांव होण्याची घोषणा होईल. बोलून टाकून निघून जायचे हे सगळ्याच सरकारांचे आहे. ४० हजार कोटी रुपये खर्चाचा आकडा जाहीर होणार आहे. अर्थसंकल्प मांडून झालेलाआहे. ही तरतूद कुठून होणार आहे? लोकांना हे समजले पाहिजे, नाहीतर ही ‘आकडेफेक’ आहे की, ‘फेक आकडे’ आहेत?  असा प्रश्न लोक विचारणार.

या पूर्वीच्या सरकारांनी अगदी निलंगेकर मुख्यमंत्री (१९८५) असताना  दहा-दहा हजार कोटींचे पॅकेज दिले होते. त्या घोषणाही याच स्टाईलच्या होत्या. हे सर्व निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकाही अनेक झाल्या. निजामाचे निशाण ही उतरून आता ७५ वर्षे झाली. पण, मराठवाड्याच्या विकासाची पताका फडकत नाही. कारणे काय? ही पताका का फडकत नाही? असे विचारणारा नेता कोण? आज मराठवाड्याला नेमका नेता कोण आहे? कोणी नाव सांगू शकेल.... पूर्वी काही नावे होती... डॉ. देवीसिंग चौहान... लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते... ते मराठवाड्यातील होते. गोविंदभाई श्रॅाफ यांनी पुढाकार घेवून मराठवाडा जनता विकास परिषद स्थापन केली होती. मराठवाड्यात सामाजिक नेतृत्त्व होते. पत्रकारितेत आ. कृ. वाघमारे, अनंत भालेराव, बाबा दळवी अशी नावे मोठी होती. राजकीय नेत्यांमध्ये शंकरराव चव्हाण हे मुख्य नाव. आज मराठवाड्याची जी काही होरपळ काही प्रमाणात वाचली आहे... त्याचे श्रेय शंकरराव यांनाच द्यायला हवे. एवढेच नव्हेतर अर्ध्या महाराष्ट्राची तहान पाटबंधारे मंत्री असताना शंकररावांनी बांधलेल्या अनेक धरणांमुळे भागलेली आहे. जाकवाडी धरण त्यातलेच... पण, जायकवाडी २०१९ साली एकदाच पूर्ण भरले. ही मराठवाड्यातील सिंचनाची आजची अवस्था. आज निरुत्साहाचे मुख्य कारण शेती संकटात आलेली आहे. पाऊस नाही... पोळ्याला पाऊस हमखास पडतो. यावर्षी तोही नाही... तिथले लोक सांगतात... सोयाबीन पीक गेल्यात जमा आहे... लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा कोणी नेता नाही. हे आजचे सरकार आकडेफेक करील... जाहिरातबाजी होईल... पण, याची मराठवाड्याला सवय झालेली आहे. त्यामुळे सरकारी निर्णयांना कोणी गांभीर्याने घेत नाही. खरंतर विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे या दोघांनंतर मराठवाड्याला नेताच नाही. त्यामुळे ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या आनंदासाठी वातावरण तयार होऊच शकले नाही. शिवाय आजच्या सरकारबद्दल फारशी मोठी आस्था आणि विश्वास लोकांना वाटत नाही. हेही त्याचे मुख्य कारण आहे. या स्थितीमध्ये ७५ वर्षापूर्वी स्वतंत्र्य झालेल्या मराठवाड्यात असलेला निरुत्साह समजण्यासारखा आहे.  एकूणच मराठवाड्याचा विचार केला तर संभाजीनगर आणि जालन्याचा काही भाग येथे उद्योग आले. प्रामुख्याने अॅाटोमोबाईल... पण, बाकी पूर्ण 


मराठवाड्यात उद्योग कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद तुफान वेगाने वाढले... आता ते जालन्याला भिडेल, अशी स्थिती आहे.  पण, बाकी मराठवाड्यातील जिल्हे आणि शेती ही अत्यंत चिंतेचा विषय ठरली आहे. रोजगाराच्या संधी नाहीत, शेतीला अनुकूल वातावरण नाही... सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही. जायकवाडी... एलदरी... विष्णूपुरी, पेनगंगा, मनार, असे सिंचन प्रकल्प उभे राहिले. पण, त्यातून दुखणे संपले नाही. आजच्या तारखेलाही मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. आजही मराठवाड्यात पाऊस नाही. राजकीय नेत्यांना मराठवाड्याचे प्रश्न समजलेच नाहीत. ज्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला त्याचे गांभीर्यही मराठवाड्यातील आमदारांना कळले नाही. विलासराव मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या प्रश्नांची चर्चा विधानसभा सभागृहात दिवसभरासाठी ठेवली होती. कोरम अभावी चारवेळा बेल वाजवावी लागली. मराठवाड्यातील आमदार त्यांच्याच भागाबद्दल एवढे ‘गंभीर’ आहेत... बाहेरून येवून दुसरे कोण मदत करणार? जायकवाडीची निर्मिती १९६६ मध्ये झाली. पण, या ६० वर्षांत जायकवाडी धरण फक्त आठ वेळा भरले. तीच परिस्थिती पूर्णा प्रकल्पाची. पूर्णा नदीच्या वरच्या भागात खडक पूर्णा प्रकल्प करण्यात आला. त्याचा परिणाम पूर्णा प्रकल्पावर झाला. जायकवाडीच्या वर प्रकल्प होत असताना मराठवाड्यातील आमदारांनी त्याला कधीही विरोधाची भूमिका घेतली नाही. शंकरराव चव्हाण यांचा अपवाद केला तर कोणीही सिंचन या विषयाला मराठवाड्यासाठी महत्त्व दिलेच नाही. मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाचे भूमीपूजन १९८५ साली शंकररावांच्या हस्ते झाले. अजूनही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. विलासराव मुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्यातून २१ टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला गेला. तसे आदेशही निघाले. विलासराव पदावरून गेले... ती फाईल अजून धूळखात पडलेली आहे. राजकीय नेत्यांची उदासिनता आणि अपुरा पाऊस त्यामुळे शेतीला पाणी नाही. दुसरीकडे उद्योग नाहीत... तिसरीकडे असलेले उद्योग बंद पडले. औरंगाबदचा व्हीडिओकॅान उद्योग बंद झाला. नांदेडचा टेस्कॅान टेक्सटाईल उद्योग बंद पडला. निजामाने सुरू केलेली उस्मानशेख गिरणी जिचे नाव नंतर एन. टी. सी.  झाले, तीही गिरणी बंद झाली. 

कोणताच नेता प्रभावी नाही. त्यामुळे मराठवाड्याचा आवाज नाही. आय. आय. टीच्या दर्जाची एकही संस्था मराठवाड्यात नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्यावर उपकार असे की, त्यांच्या पुढाकाराने मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमध्ये आले. शैक्षणिक वातावरण तेव्हा तयार झाले. नंतर अलिकडे कमलबाबूंनी अतिशय मेहनतीने आणि बंधू बाबुराव यांच्या मदतीने ‘एम. जी. एम.’ सुरू केले म्हणून एक नामवंत शिक्षणसंस्था तिथे उभी आहे. बाकी शैक्षणिक क्षेत्रातही मराठवाडा अग्रेसर आहे, असे दिसत नाही.  पशि्चम महाराष्ट्र का पुढे गेला? याचा अभ्यास करण्याची कुणाची तयारी नाही. पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळी तालुके आहेत. पूर्वी निजामाची राजवट हे मराठवाड्यासाठी कारण होते. पण, दोन पिढ्या संपल्यानंतर आता ते कारण उपयोगी पडणार नाही. मराठवाड्यातील लोक जिथपर्यंत जागे होत नाहीत तिथपर्यंत बाहेरचे लोक येऊन मराठवाड्याची पताका फडकवतील, ही अपेक्षा चुकीची आहे. यासाठी काही कटू गोष्टींचे चिंतन केले पाहिजे. राजकीय नेते आज त्या ताकतीचे राहिलेले नाहीत. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात ‘पाणी आडवा... पाणी जिरवा’ हा वसंतदादांचा मंत्र गावागावात कार्यकर्त्यांनी उचलला. मराठवाड्यातील चित्रं असे आहे की, ‘याला आडवा आणि त्याची जिरवा....’ हा कार्यक्रम येथे मोठ्याप्रमाणात राबवला जातो. विभागीय आयुक्तालयाची निर्मिती कोणत्या वादामुळे थांबली?  आज तिथले लोक असे सांगतात की, स्थिती अशी आहे की, यावर्षी पाऊस झाला नाही तर...  शेती तर आतबट्ट्यात गेलीच... कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात वाढतच चालल्या आहेत. पण, पुढच्या काळात लातूरला जसे रेल्वेने पाणी पुरवले, तसे अख्ख्या मराठवाड्याला टँकर आणि रेल्वेने पाणी पुरवण्याची भीती आहे.  यासाठी नेत्यांना द्रष्टेपण हवे. निवडणुका येतील आणि जातील... कोणी आमदार होईल... कोणी मंत्री होईल... कोणी मुख्यमंत्रीही होईल... पण, तेवढ्याने भागणार नाही. मराठवाड्याला पदे मिळतील... पण, मिळणाऱ्या पदावरचे लोक नेमके काय करतात आणि काय करतील... एक काळ पश्चिम महाराष्ट्राच्या पाठोपाठ साखर कारखानदारीत मराठवाडा पुढे होता..  एकट्या नांदेड विभागातील चार जिल्ह्यात ४२ साखर कारखाने आहेत. त्यातील आता फक्त १७ च कारखाने सुरू आहेत. अनेक साखर कारखान्यांमुळे जिल्हा बँका अडचणीत आहेत. या सगळ्या अरिष्टातून मराठवाडा कसा बाहेर निघणार... आणि कोण बाहेर काढणार?...

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा इितहास फार मोठा आहे. निजामाच्या विरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली ही लढाई झाली. १९३८ साली लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेत स्वामीजींकडे हैदराबाद लढ्याचे नेतृत्त्व दिले गेले. म्हणजे या लढ्याचा ‘नायक’ लातूरमध्ये ठरला आणि हैदराबादमधला निजामाचा रझाकार कासीम रझवी हा या लढाईतील ‘खलनायक’ लातूरचाच होता. या रझाकारांनी जवळपास २००० कुटुंबांना उद्धवस्त केले. ३५ गावे जाळून टाकण्यात आली. सरदारांनी पोलीस अॅक्शनचे आदेश दिले. मेजर जनरल ज्योयंतीनाथ चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई १०९ तास चालली. रामानंद तीर्थ यांच्याप्रमाणेच गोविंदभाई श्रॅाफ, अनंत भालेराव, गोपाळराव एकबोटे, हैद्राबादचे दिगंबरराव बिंदू (पुढे ते गृहमंत्री झाले) असे अनेक नेते नेतृत्त्व करत होते.  पण,  ९ जानेवारी १९४८ ला नेत्यांना अटक झाल्यावर पुढच्या ९ महिन्यांचा संग्राम सामान्य जनतेने केलेला आहे. जनताच जेव्हा लढ्यासाठी रस्त्यावर उतरते, तेव्हा कुठलीही राजवट उलथवून टाकता येते. हे या सामान्य माणसांनी दाखवून दिले.  हैदराबादच्या पराक्रमाची गाथा अनेकांनी अनेकप्रकारे मांडलेली आहे. (प्रा. डॉ. सतीश कदम यांनी ‘असे झुंजलो आम्ही’ या ३४० पानांच्या पुस्तकात लढ्याचा सगळा इितहास दिलेला आहे. तसेच धाराशीवचे (उस्मानाबाद) माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी मुक्ती स्वातंत्र्य दिनानिमत्त काल पाठवलेल्या लेखात २२५ वर्षांतील निजामशाहीचा सगळा तपशील दिला आहे. तोही अभ्यासपूर्ण आहे.) 

देशाला मिळालेले स्वातंत्र्य जसे एका दिवसात मिळालेले नाही. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम एका दिवसात यशस्वी झालेले नाही. निजाम एवढा लबाड होता की, इकडे शरण येण्याचा देखावा करत असताना पाकिस्तान आणि पोर्तुगालशी त्यांनी संधान बांधून शस्त्रास्त्र मिळवण्याचाा प्रयत्न सुरू केला होता. असे अनेक दाखले अनेक पुस्तकांत आहेत. त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याशीही निजामाचे संधान जुळले होते. सरदार पटेल यांनी हे सगळे डावपेच ओळखून कारवाईचे तातडीचे आदेश दिले. सरदारांच्या अंगात ८ दिवस ताप होता. ताप असतानाही सरदार वल्लभभाई बेगमपेठच्या विमानतळावर कारवाईच्या वेळी  हजर होते. निजाम शरण आला तो त्याच विमानतळावर... तेथूनच सरदारांनी त्यांच्या विमानातून निजामाला दिल्लीला नेले. 

हा विजय सामान्य जनतेचा जसा आहे... तसा सरदारांच्या निर्धाराचाही आहे. असा स्वतंत्र झालेला मराठवाडा आज ७५ व्या अमृत महोत्सवात आहे. पण त्याचा उत्साह नाही. कारण, स्वातंत्र्य मिळवून देणारा एक सरदार देशात होता. आता मराठवाड्यात नेता कोण आहे... आणि सरदार कोण आहे... मराठवाड्याच्या गंभीर प्रश्नापेक्षाही या मराठवाड्याला नेताच नाही, हाच प्रश्न सगळ्यात गंभीर आहे. आज सत्तेवर असलेले उद्या नेते असतातच असे नाही त्यांची सत्ता गेली की, ते कोण आहेत, हे त्यांना ताबडतोब कळते. आज सत्तेला महत्त्व आले आहे. त्यामुळे सगळे सत्तेभोवती आहेत. पण, त्यात  महाराष्ट्राचा किंवा मराठवाड्याचा नेता कोणी नाही. मराठवाडा स्वतंत्र झाला याचा आनंद आहे. पण, मराठवाड्याचा नेता कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मराठवाड्यात दुष्काळ येऊ पाहात आहे. तसा महाराष्ट्रातही काही भागात दुष्काळ येत आहे. पण, मराठवाड्यातील सगळ्यात मोठा दुष्काळ तगड्या नेत्याचाच आहे. 

सध्या एवढेच.📞9892033458

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.