Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूरग्रस्ताला फडणवीसांना खेचले, धक्का दिला! नागपूरात संतापाचा पूर; फडणवीस यांना रोखले

पूरग्रस्ताला फडणवीसांना खेचले, धक्का दिला! नागपूरात संतापाचा पूर; फडणवीस यांना रोखले 


महापुराच्या धक्क्यातून नागपूर अजून सावरलेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातच नुकसानीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणाऱया एका पूरग्रस्ताला खेचून फडणवीसांनी धक्का दिल्याचा व्हिडीओ समोर आणल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून याला सत्तेचा माज नाहीतर अजून काय म्हणणार असा सवाल केला आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला शनिवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. चार तासांत झालेल्या 111 मिलीमीटर पावसात नागपुर बुडाले आणि सर्वत्र हाहाकार माजला. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला, नागनदीचा प्रकोप झाला आणि शहरातील तब्बल 10 हजार घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वागताला थांबले. त्यांनी आज नागपुरात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱयात त्यांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले.

स्थिती अत्यंत गंभीर, पूर टाळता आला असता!

नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलले. पुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली आहे. या पुरामागचे कारण काय आहे, हे समजले आहे. ही परिस्थिती निश्चितच टाळता आली असती. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉइंटपासून ते नाग नदीपर्यंतचे सर्व अडथळे स्वच्छ केले असते, तर ही स्थिती उद्भवली नसती. पूर टाळता आला असता, असे फडणवीस म्हणाले.

देवाच्या घरात न्याय आहे, एक दिवस धडा मिळेल

नागपूर पालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पाहणी दौऱयात फडणवीसांना नागरिकांना धारेवर धरले. पालिकेच्या भोंगळ कारभारावरून जाब विचारला. पूरग्रस्तांचा रोष पाहून फडणवीसांना दौरा आटोपता घेतला. गर्दीतून वाट काढत गाडीत बसून ते निघून गेले. या भागातील एका महिलेने माध्यमांकडे तीव्र प्रतिक्रिया दिली. इतकी वर्षे आम्ही ओरडत आहोत. या भींताला या लोकांना साधा हात लावला नाही. या भींतीमुळेच घात झाला. आमच्या घरांमध्ये पाण्याचा लोंढा शिरला. कोणाच्या मतावर तुम्ही निवडून आला. लोकांच्या समस्याही आज तुम्ही पाहत नाही. यांच्या घरात पाणी जात नाही म्हणून त्यांना आमचं दुःख कळत नाही. देवाच्या घरात न्याय आहे, एक दिवस तुम्हालाही धडा मिळेल, असा संताप या महिलेने व्यक्त केला.

महिलांनी रोखले, जाब विचारला

पुरामुळे सर्वाधिक नुकसान अंबाझरी ले-आउट, डागा ले-आउट आणि वर्मा ले-आउट भागात झाले आहे. या भागात सहा फुटांपर्यंत पाणी तुंबले होते. त्यामुळे घरातील सर्व सामान खराब झाले आहे. घरात चिखल झाला आहे. या भागात फडणवीस आले असता लोकांनी त्यांना घरात नेऊन स्थिती दाखवली. फडणवीस पाहणी करून निघत असताना काही महिलांनी त्यांना अडवले व जाब विचारला. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही त्यांनी केली. महिलांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता बाचाबाची झाली.

सरकारने केलेली मदत तुटपुंजी

नागपूरमधील पूरग्रस्तांना सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करतानाच जेवढे नुकसान झाले तेवढी भरपाई द्या अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरातील पूर नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधायांच्या भ्रष्ट, अनियंत्रित आणि गलथान कारभाराचे पाप असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या नावाखाली नागपूर शहरात आपल्या चेल्या चपाटयांना आणि ठेकेदारांना जगविण्यासाठी काँक्रीटचे जंगल उभे केले. त्यामुळे शहर बकाल झाले आहे. एका दिवसाच्या पावसाने गडकरी आणि फडणवीस यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा, बोगस दावे आणि भाजपचा भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे, असे पटोले म्हणाले.

फोडाफोडीपेक्षा नागपूरकडे लक्ष द्या - राष्ट्रवादी

उपमुख्यमंत्र्यांचे स्वतःच्याच कर्मभूमीवर, नागपुरातच लक्ष नाही; त्यांचे महाराष्ट्रावर काय लक्ष असणार, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीने केला. आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री ही पदे ज्या नागपूरच्या जनतेमुळे मिळाली त्या नागपूरची सुधारणा का होऊ शकली नाही? सत्तेच्या हव्यासापोटी दोन पक्ष आपण फोडले. त्याऐवजी नागपूरकडे लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती, असा टोला राष्ट्रवादीने हाणला. निवडणूक आली की कामे सुरू करायची आणि निवडणूक संपली की ती अर्धवट सोडायची या नीतीमुळेच तुम्हाला नागपूरकरांच्या संतापाचा सामना करावा लागला, असेही राष्ट्रवादीने ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांना सुनावले.

चार जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पूरग्रस्त स्थिती असून आतापर्यंत 53 वर्षीय महिलेसह चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. संध्या धोरे (53), मीराबाई कप्पूस्वामी (70), संजय गाडेगावकर (52) अशी तीन मृतांची नावे असून एक अज्ञात मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने नागपूर आणि आसपासच्या जिह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

नेमके काय घडले…

पूरग्रस्त नागरिकांसोबत फडणवीसांचे खटके उडाल्याचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देणाऱया नागरिकाला फडणवीस खेचत आहेत व धक्का देऊन बाजूला करत आहेत. त्यावरून 'पूरग्रस्त नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांसोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार?' असा सवाल काँग्रेसने केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.