Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर भाऊराव पाटील हा पुरोगामी महाराष्ट्राचा संपन्न वारसा ; संजय आवटे

कर्मवीर भाऊराव पाटील हा पुरोगामी महाराष्ट्राचा संपन्न वारसा ;  संजय आवटे


सांगली दि. २२: 'भाऊराव तुम्ही मला यापूर्वी भेटला असता तर मी धर्मशाळांऐवजी शाळा बांधल्या असत्या.. दाढीवालाच खरा देव आहे.' हे संत गाडगेबाबांचे उद्गार कर्मवीरांची शैक्षणिक रयत क्रांती अधोरेखित करतात. बहुजन समाजाची उन्नती शिक्षणाशिवाय शक्य नाही म्हणून अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या घरात ज्ञानप्रकाश नेला.. त्यामुळे महाराष्ट्र प्रगत झाला.. हा वारसा विसरल्याने भोवताली भयावह स्थिती निर्माण झाली आहे. इतिहासाची मोडतोड आणि अपहरण सुरु आहे. गांधी+आंबेडकर +नेहरु=भारत हे समजून घेणे आवश्यक आहे. संविधान ही उद्याच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. 


आपण आपला महापुरुषांच्या कार्याचा वारसा सोडला म्हणून लोकशाही आणि संविधान अडचणीत आले आहे. नव्या तरुण पिढीला आणि स्त्रियांना विचार द्या.. त्यांना बरोबर घ्या म्हणजे बिघडत चाललेली परिस्थिती दुरुस्ती होईल. संविधान कोणत्याही व्यक्तीला अर्पण केली नाही तर भारतीय जनतेने ती स्वतःप्रत अर्पण केली आहे. आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत ही आपली ख्याती आहे हे पक्कं लक्षात ठेवा. देशाची विविधता मान्य करा. मुद्दा जातीचा नाही तर मुद्दा मूल्यांचा आहे. विचारांचा लढा विचाराने लढा. फुले शाहू आंबेडकर कृतीत आणा. असे प्रतिपादन लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी केले. कर्मवीर पतसंस्था व ट्रस्टच्या वतीने आज भावे नाट्यमंदिरात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली महापालिकेचे आयुक्त सुनिल पवार होते. 

प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, ' कर्मवीर पतसंस्था आणि ट्रस्ट या संस्था कर्मवीर अण्णांच्या विचाराने काम करत आहेत. सभासद हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. वित्तीय व्यवहाराबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून चांगले काम करणाऱ्या संस्थांना, दिव्यांगाना, विद्यार्थी व शाळांना मदत केली जाते. यापुढे संस्था व सभासद हितासाठी अधिक चांगले काम करत राहू. 


यावेळी मूकबधिर शाळा, बर्ड साँग आॅर्गनायझेशन व चंद्रकांत कणसे या गरीब कारागिराला रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात सुनील पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे काम आदर्श आहे.. संस्थेला वृध्दाश्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु. सांगलीच्या विकासासाठी सर्वांनी मिळून सहकार्य केले तर शहराचा विकास होईल. असे सांगितले. 

यावेळी कर्मवीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल एम एस आय ब्लड बँकेकडून संस्थेच्या संचालक मंडळाचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  आभार संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक सकळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद व कर्मवीर प्रेमी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.