Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरोगामीत्वाला काळीमा: जादूटोण्याच्या संशयावरून जमावाने महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख

पुरोगामीत्वाला काळीमा: जादूटोण्याच्या संशयावरून जमावाने महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख


नंदूरबार : जादूटोणा करून मारून टाकल्याच्या संशयावरून एका महिलेला आणि तिच्या पतीला जमावाने आधी त्रास दिला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक पूजा करायला लावली आणि त्यांनतर चक्क स्मशानातील राख खायाला लावली. ही घटना पुरोगामी म्हणून घेणाऱ्या आपल्याच राज्यातील नंदूरबार जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

16 ते 19 सप्टेंबर दरम्यान ओघाणी (ता.अक्कलकुवा,जि. नंदूरबार) येथील एका 50 वर्षीय महिलेने जादूटोणा करून ओजमा नवसा वसावे यांच्या मुलाला व खेमा नवसा वसावे यांच्या पत्नीला मारल्याचा संशय घेऊन जमावाने महिला व तिच्या पतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काही जणांशी संगमत करून गावात त्रास देणे सुरू केले. पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना तांत्रिक पूजा करायला भाग पाडले. तसेच स्मशानात घेऊन जाऊन राख खाऊ घातली. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या व प्रचंड दहशतीत आलेल्या महिलेने व तिच्या पतीने अखेर पोलिस ठाणे गाठले.

यांच्याविरोधात तक्रारीवरून गुन्हा दाखल

गावकऱ्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पीडित महिला आणि तिच्या पतीने पोलीस स्टेशन गाठले. महिलेच्या तक्रारीवरून ओजमा नवसा वसावे (58), गुला ओजमा वसावे (30), ईल्या ओजमा वसावे (28), खेमा नवसा वसावे (52), चंद्रसिंग खेमा वसावे (27) सर्व (रा.ओघाणीचा चापडापाडा, ता.अक्कलकुवा) आणि बावा ओल्या पाडवी (55) (रा.लहान अक्कलकुवा, ता.अक्कलकुवा) यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहेत.


तीन दिवस फक्त गावकऱ्यांची दहशत

जादूटोणा करून युवक व महिलेला मारून टाकल्याचा आरोप करीत स्मशानभूमीत नेऊन राख खाऊ घालत महिलेला व तिच्या पतीला वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक पूजा करायला लावली. हा सगळा प्रकार एक नव्हे तर तब्बल तीन दिवस सुरू होता. याबाबत मोलगी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील घटनेनेही वेधले लक्ष

जादूटोण्याचा संशय असल्याने एका वृद्धाच्या अंगावर अँसिड टाकून खून करण्यात आला. श्रीरंग शेजुळ असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. श्रीरंग शेजूळ हे अंगणात बाजेवर झोपलेले असताना शेजुळ यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या अंगावर द्रव पदार्थ टाकल्याचे आढळून आले. मात्र यावेळी आजूबाजूला कुणीही आढळून आले नाही. त्यामुळे श्रीरंग शेजुळ यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गावातीलच नंदू शेजुळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.