Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

“बोलून मोकळं व्हायचं”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

“बोलून मोकळं व्हायचं”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलत होते तो हा व्हिडीओ आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”

अजित पवार – “हो……येस’

देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे. संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांना घालत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचाही संदर्भ या व्हिडीओमध्ये देऊन या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे ओमराजेंनी?

मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.


मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…असं ट्वीट ओमराजेंनी केलं आहे. आता याबाबत सरकाकडून काही स्पष्टीकरण दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.