Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' म्हैसाळ टप्पा क्रमांक 4 विद्युत प्रवाहामध्ये अचानक बिघाड कालवा ओव्हर फ्लो; पिकांचे मोठे नुकसान

' म्हैसाळ टप्पा क्रमांक 4 विद्युत प्रवाहामध्ये अचानक बिघाड कालवा ओव्हर फ्लो; पिकांचे मोठे नुकसान 


आरग : येथील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक चार वारंवार 'ओव्हर फ्लो' होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी चार वाजता पंप हाऊसमधील विद्युत प्रवाहामध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे कालवा ओव्हर फ्लो झाला. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात येणारी शेती वाहून गेली आणि शेकडो एकर परिसरातील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

मिरजेसह जत तालुक्याला पाण्याची टंचाई जाणवत असल्याने म्हैसाळ योजना ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आली. एकीकडे, पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. येथील टप्पा क्रमांक चार 'ओव्हर फ्लो' होण्याची घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे.

शेतकरी गोपाळ कोरे यांची अर्धा एकर कोबी पाणी साचल्याने उद्ध्वस्त झाली आहे. दत्ता कोरे यांचा एक एकर ऊस पाणी साचल्याने कुजला आहे. तसेच मच्छिंद्र पाटील यांची एक एकर कोथिंबीर आणि ओंकार शिंदे यांची आर्धा एकर भेंडी वाहून गेली.

कालव्यामधील ओव्हर फ्लो झालेले पाणी आरग येथील मुख्य पाझर तलावात सोडण्यात येते. ओव्हर फ्लो सिस्टिम कायमची बंद करून शेतीचे होणारे नुकसान टाळण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यातच ओव्हर फ्लोचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे.

म्हैसाळ योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे येथील पंप हाऊस पासून ते पाझर तलावापर्यंतची शेती उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या वीस वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. ओव्हरफ्लो सिस्टिम बंद करून कुठे तरी एखादे दार करून त्याद्वारे पाणी पाझर तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. ओव्हर फ्लो पाण्यामुळे येथील रस्ता कातरून गेला आहे. माती वाहून गेली आहे आणि शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे. पंप हाऊसमधील विद्युत प्रवाहात चार वेळा तांत्रिक बिघाड झाल्याने कालवा ओव्हर फ्लो झाला होता. ओव्हर फ्लो सिस्टिम येथे पाण्याची पातळी कायमस्वरुपी योग्य ठेवण्यासाठी पॉईंट सात फूट उंची वाढवण्यात येणार आहे.

- आर. डी. माळी, शाखा अभियंता टप्पा क्र. ४

पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी जाणूनबुजून कालवा ओव्हर फ्लो करण्यात येतो. ओव्हर फ्लो पद्धत कायमस्वरुपी बंद करावी, शेतीतील पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. कालवा पुन्हा ओव्हर फ्लो झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- श्रीधर कोरे, नुकसानग्रस्त शेतकरी

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.