Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट 3 ऑक्टोबरपासून एक महिन्यासाठी वाहतूकीस बंद

अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट 3 ऑक्टोबरपासून एक महिन्यासाठी वाहतूकीस बंद


सांगली दि. 28 : मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465  वरून होणारी वाहतूक पुलाच्या कामकाजास्तव  3 ऑक्टोबरपासून एक महिन्यासाठी अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

अतिरिक्त महाव्यवस्थापक, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लि., मुंबई यांच्या  विनंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मोटर वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये  मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 वरून होणारी वाहतूक दि. 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी अन्य मार्गांवरून वळविण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली असून वाहतुक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. 

या आदेशानुसार मिरज शहरातुन कृष्णा घाट अर्जुनवाडकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग - शास्त्री चौक- म्हैशाळ रोड/ बेडग रोड ओव्हर ब्रिजवरुन- म्हैशाळ रोड - रत्नागिरी- नागपुर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या ब्रिजखालुन पश्चिमेस (उजवीकडे) वळण घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडने जाऊन परत कृष्णा घाट अर्जुनवाड शिरोळ रोडकडे जाता येईल. तर कृष्णा घाट अर्जुनवाड, शिरोळकडुन मिरज शहरात येणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग - कृष्णा घाट - अर्जुनवाड रोड - नागपुर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजखालुन पुर्वेकडील बाजुस (उजवीकडे) वळण घेऊन सर्व्हिस रोडने पुढे जाऊन म्हैशाळ रोडवर डावे बाजुस उत्तरेकडे वळण घेऊन म्हैशाळ/बेडगकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवरुन- शास्त्री चौक मिरजकडे येता येईल. (तसाच परत उलटा प्रवास).

अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465  वरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने अतिरिक्त महाव्यवस्थापक, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लि., मुंबई यांनी जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता, मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली, वाहतूक नियंत्रण शाखा सांगली व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांनी एकत्रितपणे कराव्यात. 

अतिरिक्त महाव्यवस्थापक, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लि., मुंबई यांनी रेल्वे गेट LC 465 वरून होणारी वाहतूक प्रतिबंध केल्याबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी ग्रामीण व शहरातील सार्वजनिक वाहतूक ठिकाणी अधिसूचना तसेच वाहतूकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आदेशात नमूद केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.