Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

388 गृहप्रकल्पांची बॅंक खाती गोठवा; 'महारेराचे' आदेश, सदनिकेच्या विक्रीवर बंदी, सांगलीतील ही प्रकल्पाचा समावेश

388 गृहप्रकल्पांची बॅंक खाती गोठवा; 'महारेराचे' आदेश, सदनिकेच्या विक्रीवर बंदी, सांगलीतील ही प्रकल्पाचा समावेश 


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडून (महारेरा) जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करतानाच बॅंक खातीही गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे या काळात संबंधित प्रकल्पातील विकासकांना जाहिरात तसेच विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महारेराकडून कारवाई केली जाणार आहे.

आतापर्यंत महारेराने विकासकांना शिस्त लागावी तसेच ग्राहकांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी यासाठी वेगवेगळय़ा उपायांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही विकासकांनी नियमांची अंमलबजावणी न केल्यास नोंदणी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रेरा कायद्यातील तरतुदीनुसार, या ३८८ प्रकल्पांनी पहिल्या तीन महिन्यांत किती सदनिकांची नोंदणी झाली, त्यापोटी किती रक्कम जमा झाली आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली, तसेच इमारत आराखडय़ात झालेला बदल (असल्यास) आदी तपशील संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे आवश्यक होते.

मात्र याची पूर्तता न केल्यामुळे या विकासकांना आधी १५ दिवसांची आणि नंतर रेरा कायद्यातील कलम ७ नुसार प्रकल्पाची नोंदणी रद्द किंवा स्थगित का करू नये, अशी विचारणा करणारी व ४५ दिवसांची मुदत देणारी नोटीस बजावलेली होती. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. परिणामी, या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात आली असून त्यामुळे प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री करण्यावर बंधन आले आहे. या प्रकल्पातील कुठल्याही विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याचे आदेशही महारेराने संबंधित उपनिबंधकांना दिले आहेत.

कोणत्या शहरांतील प्रकल्प?

मुंबई महानगरातील शहर (३), उपनगर (१७), ठाणे (५४), पालघर (३१), रायगड (२२) अशा १२७ तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (८९), सातारा (१३), कोल्हापूर (७), सोलापूर (५), अहमदनगर, सांगली प्रत्येकी तीन अशा १२० प्रकल्पांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (५३), जळगाव तीन व धुळे एक अशा ५७ तर विदर्भातील नागपूर (४१), वर्धा व अमरावती (प्रत्येकी चार), वाशीम, चंद्रपूर प्रत्येकी दोन, तर अकोला, यवतमाळमधील प्रत्येकी एक अशा ५७ प्रकल्पांचा समावेश आहे. मराठवाडय़ातील संभाजीनगर (१२), लातूर (दोन) तर नांदेड, बीड प्रत्येकी एक अशा १६ तर कोकणातील सिंधुदुर्ग (सहा) आणि रत्नागिरी (पाच) अशा ११ प्रकल्पांचा समावेश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.