लांडग्यांच्या हल्ल्यात 26 मेंढ्या ठार तर 20 गायब
सागंली : कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपावर मंगळवारी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला केला. बागेवाडी (ता. जत) गावच्या शिवारात झालेल्या या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार झाल्या असून २० मेंढ्या गायब आहेत. या प्रकाराची वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे.
राधानगरी तालुक्यातील अंशेवाडी येथील बिरू विठ्ठल जोग हे मेंढपाळ अडीचशे मेंढ्याचा कळप घेऊन चारण्यासाठी जत तालुक्यात आले आहेत. सोमवारी रात्री बागेवाडी येथील नानासाहेब पडळकर यांच्या शेतात हा मेंढ्यांचा कळप वस्तीला होता. आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास लांडग्यांच्या झुंडीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मेढरे सैरभैर होउन इतस्तत: विखरून शिवारात पळाली. मेंढ्यांचा कालवा उठल्याचे पाहून मेंढपाळ व रानमालक यांनी धाव घेतली असता अनेक मेंढरे पळाली तर काही मेंढ्या लांडग्यांच्या हल्ल्यात जागीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसले. या हल्ल्यात कळपात व शिवारात २६ मेंढ्या मृतावस्थेत आढळल्या असून काही मेंढ्या जखमी झाल्या आहेत. तर २० मेंढ्या गायब आहेत. या मेंढ्यांना लांडग्यांच्या टोळीने गायब केले असण्याचीच दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही माहिती मिळताच गावचे सरपंच करन शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य व वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला असून या हल्ल्यात मेंढपाळाचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळाला वन विभागाने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी गावकर्यांनी वन कर्मचार्यांकडे केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.