इस्लामपूर मध्ये जुन्या वादातून दोन गटांत जबरी हाणामारी; 22 जण जखमी, 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सागंली : सांगलीमधील इस्लामपूर शहरातील माकडवाले गल्लीतील दोन गटात जुन्या भांडणाच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांतील २२ जण जखमी झाले. या हाणामारीत लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, काठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला परस्परांच्या घरांची नासधूस करण्यात आली.
या हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटांनी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. विनोद वसंत पवार (वय 34, माकडवाले गल्ली) आणि दशरथ राजू पवार (वय 34, माकडवाले गल्ली) अशा दोघांनी फिर्यादी दिल्या आहेत. दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरावर चाल करून जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत.
विनोद पवारने दिलेल्या फिर्यादीत तो ओळखीच्या इतर 10 जणांसोबत घरासमोर बोलत बसला असताना प्रथमेश दिलीप कुचीवाले यानं बेकायदा गर्दी जमवून जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केला. घरांवर आणि खिडक्यांवर दगडफेक करीत नासधूस केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात विनोदसह साहिल कुचीवाले, यल्लप्पा अन्नाप्पा कुचीवाले, संदीप जाधव, राकेश जाधव, गणेश गुळके, सविता कुचिवाले, सुधीर कुचिवाले, प्रशांत कुचिवाले, पूजा कुचिकोरवी असे 10 जण जखमी झाले आहेत.
दशरथ पवारने दिलेल्या फिर्यादीत तो इतर 12 जणांसमवेत दारात बसले होते. यावेळी विनोद पवार 38 जणांचा बेकायदा जमाव घेऊन चालून आला. या सर्वांनी घरांव दगडफेक करीत नुकसान केले. या हल्ल्यात संतोषी पवार, यल्लप्पा कुचिवाले, रवींद्र कुचिवाले, सुरेश कुचिवाले, संदीप कुचिवाले, विनोद कुचिवाले, पूजा कुचिवाले, प्रमोद कुचिवाले, यल्लव्वा कुचिवाले, निकित कुचिवाले, अंकिता कुचिवाले आणि अनिकेत कुचिकोरवी असे 12 जण जखमी झाले. या दोन्ही गुन्ह्यांचा इस्लामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी स्वतंत्रपण तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.